(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; 'इतके' पर्यवेक्षक करणार सर्वेक्षण
Nashik News : मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार 23 ते 31 जानेवारी या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण होणार आहे.
Maratha Reservation नाशिक : मराठा समाजाचे (Maratha Community) मागासलेपण तपासणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार 23 ते 31 जानेवारी या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण (Survey) होणार आहे. त्याअनुषंगाने प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विहित मुदतीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे (Bhimraj Darade) यांनी दिल्या आहेत.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मराठा सर्वेक्षण मोबाईल ॲप प्रशिक्षण प्रसंगी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार वैशाली आव्हाड यांच्यासह प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती
उपजिल्हाधिकारी दराडे म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Nashik Rural) या सर्वेक्षणासाठी 6 हजार 682 प्रगणक व 454 पर्यवेक्षक अधिकारी जिल्हा प्रशासनामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिक शहर (महानगरपालिका क्षेत्र) मध्ये (Nashik City) सर्वेक्षणासाठी 2 हजार 546 प्रगणक व 159 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) साठी (Malegaon) 1 हजार 169 प्रगणक व 80 पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत. तर देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी (Deolali Cantonment) 136 प्रगणक व 6 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी सहकार्य करावे
नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी 23 जानेवारीपासून सुरू होणारी सर्वेक्षण मोहिमेत आपले पूर्ण योगदान द्यावे असे सूचित करून निश्चित केलेली जबाबदारी दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नागरिकही पूर्णपणे सहकार्य करतील, असा विश्वास उपजिल्हाधिकारी दराडे यांनी यावेळी व्यक्त केला. या सर्वेक्षणात अधिक अचूकता यावी यासाठी सविस्तर प्रश्न नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करून आपली सविस्तर माहिती द्यावी, असे आवहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
कोणत्या तालुक्यात किती प्रगणक, पर्यवेक्षक?
नाशिक तालुक्यात या सर्वेक्षणासाठी २५४ (प्रगणक) व १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी ३६९ (२४), कळवण ४४५ (२९), चांदवड ३३५ (२१), त्र्यंबकेश्वर २८३ (२१), दिंडोरी ५६५ (३८), देवळा २९३ (२०), नांदगाव ५६३ (४४), निफाड ८४६ (५७), पेठ १०७ (८), बागलाण ७६५ (४९), मालेगाव ६७६ (४५), येवला ५६७ (४२), सिन्नर ४०३ (२७), सुरगाणा २१० (११), कॅन्टोन्मेंट बोर्ड नाशिक १३६ (६) आणि नाशिक (महानगरपालिका क्षेत्र) २५४६ (१५९) व मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) ११६९ (८०) असे एकूण १० हजार ५३३ प्रगणक व ६९९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आणखी वाचा