Nashik Lok Sabha : अजितदादांचा फोन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अखेर माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर, हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मैदानात
Nashik Lok Sabha Constituency : महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आल्याने सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे नाराज होते. अखेर कोकाटेंची नाराजी आता दूर झालीय.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अनेक दिवस कायम होता. अगदी शेवटच्या क्षणी महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आल्याने सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे नाराज होते. चारच दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांच्या सांगण्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत हेमंत गोडसे आणि पालकमंत्री दादा भुसेंच्या (Dada Bhuse) तक्रारीही केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी तुमची नाराजी दूर करा आणि हेमंत गोडसेंना साथ द्या, असं माणिकराव कोकाटेंना म्हटलं होते. अखेर कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर कोकाटे यांची नाराजी दूर झाली असून आजपासून माणिकराव कोकाटे गोडसेंच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
अजितदादांचा माणिकराव कोकाटेंना फोन
माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजित दादांचा फोन आला आणि महायुतीचे काम करा, असे मला सांगण्यात आले. अजितदादांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा. त्यानुसार मी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. हेमंत गोडसे आणि पालकमंत्री दादा भुसेंच्या तक्रारी केल्यात.
अखेर माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर
मी या सरकारमध्ये सामील झाल्यापासून एक हजार कोटींची कामे केली. पुढेही खूप कामे करायची आहेत. आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या कामाला लागलो आहोत. मुख्यमंत्री आज येत आहेत, त्यामुळे आज वातावरण सुधरेल, अशी अपेक्षा असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. आता माणिकराव कोकाटे यांची नाराजी दूर झाल्याने हा हेमंत गोडसेंना मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या