Malegaon to Kedarnath : रोज शंभर किमी, 15 दिवसांत 1700 किलोमीटर, मालेगाव ते केदारनाथ अशा थक्क करणाऱ्या सायकल प्रवासाची गोष्ट
Malegaon to Kedarnath : मालेगाव ते केदारनाथ (Malegaon To Kedarnath) असा सायकलवरून प्रवास करून दत्ता सूर्यवंशीने नवा इतिहासच रचला आहे.
Malegaon to Kedarnath : एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय मालेगावच्या (Malegaon) दत्ता सूर्यवंशी या तरुणाला आला आहे. या तरुणाने पंधरा दिवसांत तब्बल 1652 किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. मालेगाव ते केदारनाथ (Malegaon To Kedarnath) असा सायकलवरून प्रवास करून त्याने नवा इतिहासच रचला आहे. त्याच्या या अनोख्या प्रवाशाचे नाशिकसह मालेगावकरांकडून जोरदार कौतुक होत आहे.
केदारनाथ हे अनेकांच्या आवडीचं ठिकाण म्हणून ओळखले जाते. केदारनाथला जायचं म्हटलं की प्रत्येकजण तयार असतो. मग आपलं काम सोडूनही लोक अगदी आवर्जून केदारनाथला जातात. मात्र केदारनाथला जायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. केदारनाथपर्यंतचा प्रवास सोपा नसून चांगल्या चांगल्या प्रवाशांची दमछाक होऊन जाते. नाशिकच्या (Nashik) मालेगावमधील दत्ता सूर्यवंशी (Datta Suryavanshi) या तरुणाने मनाशी खूणगाठ बांधत केदारनाथ पंधरा दिवसांत सर केला आहे. मालेगावहून थेट केदारनाथला सायकलवरून त्याने हा प्रवास केला असून तिथे पोहचल्यानंतर दर्शन घेण्यासाठी तो मनसोक्त रडल्याचे त्याने सांगितले. एखादी गोष्ट करायची ठरविल्यास आपली मेहनत, जिद्द आणि धाडस असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे दत्ता म्हणाला.
दत्ता सूर्यवंशी हा मुळचा मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील राहणारा आहे. मालेगाव (Malegaon) येथीलच एका हॉटेलमध्ये तो काम करतो. त्याच्या पगारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र एक दिवस त्याने ठरविलं कि आपण मालेगाव ते केदारनाथ असा प्रवास करायचा, तोही एकट्याने. याबाबत घरच्यांना त्याने कल्पना दिली, मात्र कुटुंबीयांनी यास नकार दिला. अनेक वर्ष त्याने आईवडिलांची समजूत काढली, शेवटी एक दिवशी आईवडिलांना त्याला होकार दिला. त्याने मालकाकडून 15 हजार रुपये घेतले. एक सायकल, कपडे, थोडे तांदूळ, काही भांडे घेऊन त्याने 22 मे रोजी प्रवास सुरु केला.
दररोज शंभर किमी सायकल चालवली....
दत्ताने सोबत एक मोबाईल फोन ठेवत Google मॅप्स वापरून तो प्रवास करत होता. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो सायकल चालवत, दररोज 100 किमी अंतर कापण्याचे त्याने लक्ष्य ठेवले होते. मार्गाने त्याला मालेगाव, धुळे, इंदूर, देवास, शहाजापूर, शिवपुरी, ग्वाल्हेर, आग्रा, अलीगढ, मुझफ्फरनगर, रुरके, हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, श्रीनगर आणि गौरीकुंड असा त्याने थक्क करणारा प्रवास केला. जवळपास 1700 किलोमीटर सायकल चालवण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला. प्रवासादरम्यान आजारपण आणि अंगदुखी अशा अनेक समस्या त्याला जाणवत होत्या. पण कोणत्याही किंमतीत हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार होता. दत्ताला अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करावा लागला, पण त्याचा दृढनिश्चय जिंकला. आपल्या प्रवासात अशक्य अडचणी, वेदना आणि वेदना सहन करत, केदारनाथला पोहोचल्यानंतर दत्ताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आल्याचे त्याने सांगितले.
मंदिरात पोहचलो तेव्हा रडलो....
दत्ता म्हणाला कि, सोबत घेतलेले तांदूळ मी प्रवासादरम्यान दान करून टाकले. तसेच दत्ता ज्या रेस्टॉरंट काम करत असतो, त्या रेस्टॉरंटचे मालक कृष्णा शेट्टी म्हणतात, तो गेल्या 10-12 वर्षांपासून माझ्यासाठी काम करत आहे आणि त्याला मदत करणे, हे माझे कर्तव्य होते. सुरुवातीला त्याला नाही सांगितले, कारण तो एकटा कसा प्रवास करेल, याची मला चिंता होती, पण त्याने मला अनेक वेळा विनंती केली आणि मी होकार दिला. सायकलवरून प्रवास का निवडला हे विचारल्यावर तो म्हणाला, 'मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आल्याने इंधनाचा खर्च किंवा ट्रेनचे तिकीट परवडणारे नव्हते. वाटेत लोकांकडून खूप मदत मिळाली, जेवण, पाणी, राहण्यासाठी व्यवस्था केली. 7 जून रोजी केदारनाथ मंदिरात पोहोचल्यावर अक्षरशः अर्धा तास रडल्याचे तो म्हणाला.