Nashik News : नाशिकच्या हेरिटेज वास्तूत पावसाळ्यात 'पाणी गळती', छतावर कापड टाकून संरक्षण
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयावर (Nashik Collector Office) पावसापासून बचावासाठी कापडाचे आच्छादन करण्यात येत आहे.

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील हेरिटेज वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर कापडाचे आच्छादन करण्यात येत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी गळते, यापासून बचावासाठी कापडाचे आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करण्यात येत आहेत.
दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू हेरिटेज वास्तू म्हणून ओळखली जाते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही वास्तू पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळत असल्याने सध्या डागडुजीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीच्या कौलांवर मेणकापड चढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची दगडी इमारत भक्कम उभी असली तरी पावसाळ्यात छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे काय ठिकाणी पावसाचे पाणी खाली पडते. त्यामुळे दरवर्षी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते.
यंदा देखील इमारतीच्या छतावर मेणकापड टाकून गळती बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्यामुळे लाकडे खराब होऊ नये म्हणून त्यांना रंग दिला जात आहे. नुतन जिल्हाधिकारी रुजू झाल्यापासून कार्यालय परिसर देखील बदलून गेला आहे. आवारातील अनावश्यक वाहनांची पार्किंग हटविण्यात आले आहे परिसर मोकळा राहील याबाबत काळजी घेतली जात आहे जिल्हाधिकारी कार्यालय कडे जाणाऱ्या मार्गावर बसवला जाणार आहे त्यासाठीचे खोदकाम आणि मोजमाप करण्यात येत आहे येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अधिक मोकळा आणि सुटसुटीत करण्यात येत आहे त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
इथंही कापडाचे आच्छादन
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा न्यायालयाची इमारतही पुरातन असल्याने या ठिकाणी देखील कापड टाकण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने शासकीय कार्यालयाच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे झाकली जात आहेत. त्यात नाशिक तहसील कार्यालयाची इमारत, तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेले सेतू कार्यालय, त्याच परिसरात असलेल्या उप निबंधक कार्यालय आदींवरही कापड टाकण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यलय दीडशे वर्षांचे
जिल्हाधिकारी कार्यालय तर ब्रिटिशकालीन असून, त्यातील अनेक इमारती या जीर्ण झाल्या आहेत. जवळपास दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक इमारतींच्या छपराला छिद्र पडले असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. त्या पार्श्वभूमीवर कापडाचे आच्छादन टाकण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी कागद भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत इमारतींना प्लॅस्टिक आच्छादन टाकून झाकून ठेवण्यात येतात.





















