Nashik News : हद्दच झाली राव! रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती, नवजात बालकाचा मृत्यू
Nashik News : महिलेची प्रसूती होऊन नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या (Nashik) सटाणा ग्रामीण रुग्णालयात (Satana Rural Hospital) घडली आहे.
Nashik News : गर्भवती महिलेला उपचार नाकारत तिला दाखल करून घेण्यासाठी नकार दिल्याने प्रवेशद्वारावर संबंधित महिलेची प्रसूती होऊन नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या (Nashik) सटाणा ग्रामीण रुग्णालयात (Satana Rural Hospital) घडली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी रुग्णालयाला कुलूपस लावले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात अल्पवयीन युवतीचा अवैध गर्भपात (Illegel Abortion) केल्याप्रकरणी हे रुग्णालय चर्चेत आले होते.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहर परिसरातील जुनी शेमळी या गावात सोनवणे कुटुंबीय राहते. यांच्या घरातील महिलेला काल रात्री कळा सुरु झाल्याने त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार वाहनाच्या सहाय्याने ते रुग्णालयात आले, मात्र यावेळी रुग्णालयातील कर्मचार्यांनी महिलेला प्रवेश नाकारत दाखल करून घेण्यास नकार दिला. यावेळी नातेवाईकांनी टाहो फोडत महिलेला वेदना होत असून इथ दाखल करून घ्या. यात वेळ गेल्याने शेवटी महिला रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाली.
सटाणा शहराजवळील शेमळी येथील मनीषा समाधान सोनवणे या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला कळा येत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. परंतु वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण सांगून तिला मालेगाव किंवा कळवण रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. आपल्याला प्रचंड वेदना होत असून प्रकृती बिघडली असल्याची विनंती महिला तसेच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना केली. परंतु कोणीही दाद दिली नसल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला.
यादरम्यान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिला प्रसूती झाली. दुर्दैवी बाब म्हणजे प्रसूत झाल्यानंतर काही वेळातच नवजात अर्भक दगावल्याची घटना घडली. यामुळे नातेवाईक तसेच गावकरी संतापले. सरपंच संदीप बधान तसेच माजी आमदार संजय चव्हाण आदींनी रुग्णालयात टाळे ठोकले, जिल्हा शलचिकित्सक दाखल होत नाही तोपर्यंत टाळे न उघडण्याची भूमिका त्यांनी घेतली नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अवैध गर्भपाताची घटना
काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची घटना चांगलीच गाजली होती. हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे गेले होते. त्यानंतर तातडीने कारवाई करीत कंत्राटी तत्त्वावरील शिरोग तज्ञाला निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात आलेला होता. आता गरोदर महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे गरोदर माता तपासणी शिबीर सुरू असतांना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.