(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Udhhav Thackeray : 'मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव', उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी उर्दू होर्डिंग
Nashik Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावात मराठीसोबत उर्दू होर्डिंग लावण्यात आले आहे.
Nashik Udhhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhhav Thackeray) यांची मालेगाव (Malegaon) येथे जाहीर सभा होत असून राजकीय पार्श्वभूमीवर महत्वाची सभा मानली जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावात मराठीसोबत उर्दू होर्डिंग लावण्यात आले आहे. मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव" असा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे.
आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या मालेगाव शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेतील (Urdu Hoardings) होर्डिंग्स लावण्यात आलेत या होर्डिंगचा खासदार संजय राऊत यांनी सुद्धा समर्थन केले. उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव मध्ये जाहीर सभा होत आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा हा गड मानला जातो आणि याच ठिकाणी अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर खेड नंतरची ही दुसरी महाराष्ट्रातली उद्धव ठाकरेंची सभा आहे आणि या सभेसाठी मालेगावमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत.
मालेगाव शहरात आज शिवसेना ठाकरे गटाची जाहीर सभा होत असून अनेक ठिकाणी उर्दू भाषेमध्ये देखील होर्डिंग लागलेले आहेत. 'शिवसेनेचे मालेगाव मालेगावची शिवसेना' अशा स्वरूपाचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यांमध्ये या होर्डिंगविषयी त्याचबरोबर मालेगावमध्ये होणाऱ्या सभेविषयी उत्सुकता आहे. याआधी देखील शिवसेनेचे कॅलेंडरचे उर्दू भाषेमध्ये छापण्यात आलेले होते. त्यावर देखील टीका झालेली होती. आजही संजय राऊत यांनी सांगितलं की, उर्दू भाषा ही सर्वांची भाषा आहे, उर्दू भाषेमध्ये जर होर्डिंग छापले तर त्यामध्ये गैर काय? अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. इथल्या मुस्लिम समुदायाला आकर्षित करण्यासाठी अशा उर्दू भाषेतील होर्डिंग लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे, मात्र खासदार संजय राऊत यांच्याकडूनया होर्डिंग्सचे समर्थन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष ...
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एक मंत्रीपदाचा कार्यभार देखील ते सांभाळत आहेत. मात्र शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट एकाकी पडला होता. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.