Nashik Mango Export : नाशिकचा केसर आंबा थेट अमेरिकेत पोहचला, तब्बल बाराशे किलोंची निर्यात
Nashik Mango Export : सुरगाणा तालुक्यातील (Surgana) शेतकऱ्याने आंब्याच्या 60 झाडांपासून तब्बल लाखो रुपयांचे उत्पादन घेत तब्बल बाराशे किलो आंबा (Mango) प्रथमच अमेरिकेत (America) पोहोचवला आहे.
Nashik Mango Export : 'कष्टाला फळ मिळतच' या म्हणीचा प्रत्यय नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) सायळपाडा येथील शेतकऱ्याला आला आहे. या शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर लावलेल्या आंब्याच्या 60 झाडांपासून तब्बल लाखो रुपयांचे उत्पादन घेत तब्बल बाराशे किलो आंबा प्रथमच अमेरिकेत (America) पोहोचवला आहे.
सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. सगळीकडे बाजारात आंबेच आंबे दिसू लागले आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबियांसाठी, नातेवाइकासांठी आंबा खरेदी करताना दिसत आहेत. या आंब्याची चव फक्त भारतातच नाही तर परदेशातही तितकीच प्रिय आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आंबा परदेशवारी साठी जात असतो. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेल्या सुमारे पन्नास ते साठ आंब्याच्या झाडांपासून मिळालेल्या उत्पादनापैकी बाराशे किलो केशर आंबा थेट अमेरिकेत मॉलमध्ये पाठवण्यात आला आहे. यातून या शेतकऱ्याला तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दहा वर्षांत प्रथमच त्यांचा केसर आंबा अमेरिकेत पोहोचला असल्याने शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुरगाणा तालुक्यातील सायळपाडा या आदिवासी पाड्यावरील गिरीधर छबू धुम या शेतकऱ्याने हा अनोखा प्रयोग केला आहे. धूम यांची घराजवळ शेती आहे. जवळपास दोन हेक्टरवर केशर आंब्याची लागवड केली आहे. दरम्यान सध्या आंब्यांचा सिझन असल्याने काही दिवसांपूर्वी या आंब्यांना परदेशी बाजारपेठ मिळावी यासाठी इको किसान फार्मर प्रोड्यूसर कंपनी पुढाकार घेतला होता. या कंपनीचे संचालक विशाल जाधव यांच्या प्रयत्नांतुन आंब्याची नोंदणी करण्यात आली. यानंतर हा आंबा चाचणीसाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठविण्यात आला. त्यानंतर कृषी विभाग, विशाल जाधव या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्याचा माल प्रथमच थेट अमेरिकेत पोचला आहे.
दहा वर्षात प्रथम आंब्याची परदेशवारी
दोन हेक्टर जमिनीवर या बांधावर 50 ते 60 केशर आंब्याची लागवड केली आहे कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने पहिल्यांदाच परदेश वारीसाठी नोंदणी केली होती आणि आमच्या शेतातील आंब्याला आंब्याची निवडही परदेश वारीसाठी करण्यात आली त्यामुळे जवळपास जागेवरच आंब्याला 100 किलोचा दर मिळाला तर काही आंबा हा गुजरातला पाठवला शेतकरी सुरगाणा
आंबा असा पोहचला अमेरिकेत
सुरगाणा कृषी विभागाने आंबा लागवडीची पाहणी केली. यानंतर त्यांनी किसान फार्मर प्रोड्युसरचे विशाल जाधव यांना आंबा परदेशवारी साठी निवड करावी अशी विनंती केली. यानंतर आंब्याची पाहणी केल्यांनतर काही सॅम्पल पुण्यातील एकालॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचबरोबर एका संकेस्थळावर अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यांनतर आंब्याची परदेशवारी साठी निवड करण्यात आली. यात सुमारे बाराशे किलो आंब्याची अमेरिकेत यशस्वीपणे निर्यात करण्यात आली.