Nashik : व्यवसाय करायचाय, भांडवल नाही! फक्त एक अर्ज करा अन् व्यवसाय उभारा!
Nashik Job Majha : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने युवकांसाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.
Nashik Job Majha : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी (Farmers) बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी एक अर्ज करून जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात (Maharashtra) हजारो तरुण बेरोजगार असून नव्या व्यवसायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अनेक जणांकडे भांडवल नसल्याने व्यवसाय उभारण्यास अडचणी येतात. मात्र राज्य शासनाने महत्वपूर्ण योजना (Scheme) आणली असून याद्वारे एकही रुपया भांडवल न लावता व्यवसाय उभारण्याची नामी संधी चालून आली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज (Online Form) करून नोंदणी करावयाची असून त्याद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द उसलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे.
आता याबरोबर नाशिक जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. तसेच योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपवर उपलब्ध आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
अशा आहेत योजना
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
असा करा अर्ज...
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:
https//ah.mahabms.com
अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशनचे नाव :
AH.MAHABMS ( Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध )