Nashik Crime : पैसे परत करा, नाहीतर पतीच्या किडन्या विकून टाकेल, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
Nashik Crime : पैशांच्या वादातून अपहरण केलं, त्याच्या बायकोला किडन्या विकून टाकेल अशी धमकी दिली.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या (Crime) घटनांना पेव फुटले आहे. सामान्य नागरिकांची सुरक्षिताच धोक्यात आली आहे. अशातच अंबड (Ambad) परिसरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या पतीला सकाळी सकाळी घरातून अपहरण करून फोनवरून आत्ताच्या आत्ता साडेसात लाख रुपये दिले, नाहीतर पतीच्या किडन्या विकून टाकण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या सिडको भागातील कामठवाडे भागात ही घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या भावसार यांचे घरातूनच अपहरण करत उसनवार घेतले पैसे दिले नाही. म्हणून पत्नीला फोन करत पैसे दे नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या विकून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ,अश्विनी भावसार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी सात वाजता अश्र्विनी यांचे पती भूषण भावसार हे घरी असताना संशयित वैभव माने आणि त्याच्यासोबत आलेला एक पुरुष आणि एक महिला यांनी पैशाच्या वादातून भूषण भावसार यांना घरातून बळजबरीने दूचाकीवर बसवून अपहरण करून घेऊन गेले.
संशयित वैभव माने आणि त्याचा एक मित्र तसेच एक महिला भावसार यांच्याघरी आले. पैशांचा वाद असल्याने तिघांनी पतीला घरात शिवीगाळ केली. पैसे आत्ताच पाहिजे म्हणून भूषण भावसार यास दुचाकीवर बसवून घेऊन गेले. दरम्यान बराच वेळ झाला पतीचा फोन नाही लागत नव्हता. त्यांच्या इतर मित्रांना फोन केला, मात्र पतीचा ठाव ठिकाण सापडला नाही. त्या रात्री पतीच्याच मोबाईलवरून अश्विनी यांना फोन आला. मोबाईलवर बोलणारा संशयित वैभव माने यांनी फोन घेतला होता. 'माझे सात लाख 50 हजार रुपये आत्ताच्या आत्ता पाहिजे नाहीतर, तुझ्या पतीच्या दोन्ही किडन्या काढून विकून टाकेल' अशी धमकी दिली. अश्विनी भावसार यांना प्रचंड धक्का बसला. नातेवाईकांना सदर प्रकाराबाबत माहिती देण्यात आली त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.
अश्विनी यांनी पोलिसात धाव घेत संबंधित घटनेची माहिती दिली. घटनेबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला. रात्रीच तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास सुरू असताना संशयितांचा सिन्नरपर्यंत माग काढला. दरम्यान सिन्नरमधून संशयितांना ताब्यात घेत भूषण भावसार यांची सुटका केली. चौकशी केली असता भावसार यांनी फायनान्स कंपनीचे कार्यालय सुरू केले असून या माध्यमातून कर्ज काढून देत असल्याचे सांगण्यात आले. संशयितांचेही पैसे घेतले असून कर्ज प्रकरण मंजूर केले नसल्याने त्यांचे अपहरण केल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली.