Nashik News : रानभाजी महोत्सवाला नाशिकरांचा प्रतिसाद, दिवसभरात लाखोंची उलाढाल
Nashik News : नाशिक (Nashik) पंचायत समितीच्या आवारातील रानभाज्या महोत्सवास (Ranbhaji Mahotsav) नाशिककरांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून दिवसभरात एक लाखापर्यतची उलाढाल होत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात सुरु असलेल्या रानभाज्या महोत्सवास (Ranbhaji Mahotsav) नाशिककरांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून आज 61बचत गटांनी महोत्सवात सहभाग घेतला. आज या महोत्सवात एक लाखापर्यतची उलाढाल झाली असून या विक्रितून बचत गटांना उत्पन प्राप्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये रानभाजी महोत्सव सुरु असून या महोत्सवास नाशिकसह राज्यभरातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या महोत्सवात अनेक बचतगटांनी सहभाग नोंदविला असून अनेक महिलांनी वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. नाशिककर दररोज या महोत्सवाला भेट देत असून अनेकजण रानभाजी खरेदी, घरगुती मसाले आदींची खरेदी करीत आहेत. रानभाज्या महोत्सवाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देऊन बचत गटांमार्फत विकल्या जाणा-या रानभाज्या व इतर वस्तुंची माहिती घेत बचत गटांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले.
गेल्या तीन वर्षापासून नाशिक पंचायत समितीच्या आवारात उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद – अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दर शुक्रवारी १० ते २ या वेळेत नाशिककरांसाठी रानभाज्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत आदिवासी बांधवांना व महिला गटांना आपल्या वस्तु विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन महिने चालणा-या या महोत्सवात रानभाज्यांबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तुही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
एकाच दिवशी लाखोंची उलाढाल
रानभाजी महोत्सवात प्रत्येक तालुकयातील बचत गटांना सहभागी करुन घेण्यात येत आहे. या आठवडयासाठी ५५ बचत गटांनी रानभाज्या महोत्सवाकडे नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात आज ६१ गटांनी सहभाग नोंदविला. यामध्ये रानभाज्या विक्रीसाठी आणलेले ३३ गट, जेवणासाठीचे ४ गट व इतर वस्तु घेऊन आलेल्या २४ गटांचा समावेश होता. आज पाऊस असतानाही नाशिककरांनी रानभाज्या खरेदीसाठी गर्दी केली. रानभाज्या तसेच विविध वस्तुंच्या विक्रीतून आज एक लाख चार हजार ४८० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली. त्याचबरोबर पुढील शुक्रवारी आयोजित केल्या जाणा-या रानभाज्या महोत्सवाला जास्तित-जास्त नाशिककरांनी भेट द्यावी असे आवाहन केले.
रानभाज्या महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी व कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत. यावेळी गट विकास अधिकारी डॉ सारिका बारी, सहायक प्रकल्प संचालक विनोद मेढे, परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गट विकास अधिकारी स्नेहल लाड, अभियान व्यवस्थापक बंडू कासार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन विंचूरकर, संदीप गडाख, निलेश हिरे, नितीन कापुरे, जगन्नाथ गोसावी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.