Nashik News : लाल कांद्यासह खरीप कांदाही रडवणार, आवक वाढणार, मागणी घटणार, काय आहेत संकेत?
Nashik News : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजारात समितीत कांद्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
Nashik News : कांदा भावात (Onion Rate) सततच्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच आज सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत ठिकठिकाणी आंदोलने (Protest) केली. कांद्याला जास्तीत जास्त हमीभाव द्यावा, 15 ते 20 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे, निर्यात सुरू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता सरकारने गांर्भीयाने विचार करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्यासह इतर पिकाला मातीमोल भाव मिळत असून शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च देखील सुटेनासा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजच लासलगाव (Lasalgaon) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लिलाव बंद पाडला. दुसरीकडे सिन्नर (Sinnar) येथील शेतकरी महिलेच्या उद्विग्न प्रतिक्रियेचा व्हिडिओ समोर आला. तर आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या (Nashik) उपजिल्हाधिकारी कार्यालयात रयत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत कांदा प्रश्न चांगलाच पेटला आहे.
एकीकडे राज्यात लेट खरीपच्या लागवडी खालील क्षेत्र 1 लाख 63 हजार हेक्टर आहे तर एकट्या नाशिक जिल्ह्यात 51 हजार हेक्टर जमिनीवर लाल कांद्याची लागवड झाली आहे. त्यातील अजूनही निम्मा म्हणजे साधारणपणे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील कांदा अजूनही बाजारात येणे बाकी आहे. कांद्याच्या माध्यमातून लासलगावसह जिल्ह्यातील इतर बाजारात समितीत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र सध्या गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात कांद्याला मागणीच नाही. सध्या बाजारात येणारा लाल कांदा लवकर खराब होत असल्याने त्याची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे आवक वाढतेय तर दुसरीकडे मागणी नसल्याने शेतकरीचा उत्पादन खर्च ही भरून निघत नाही.
त्यातच दुसरीकडे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशातील निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे ढिगच्या ढीग जमा होत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा दिला. लेट खरीप कांदा साधारणपणे एप्रिल अखेर पर्यंत बाजारात येणार आहे. त्यानंतर उन्हाळ कांदाची आवक सुरू होणार आहे. जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याची लागवड दोन लाख हॅकटर क्षेत्रावर झाली असल्याने उन्हाळ कांद्याचे ही बंपर क्रॉप येण्याची शक्यता आहे. त्यांमुळे कांदा येत्या काळातही शेतकऱ्यांना रडवणार असल्याचेच संकेत मिळत असून सरकार काय दिलासा देणार याकडे लक्ष लागले आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या शेतकऱ्यांनी कांदा भाकर हातात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पगार म्हणाले कि, पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुरू असलेलं रयत क्रांती संघटनेचं आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आलं आहे. उद्या नाही तर परवा रयत क्रांतीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली जाईल आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांना दिले आहे.