(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले!
Nashik News : कांदा दरात सातत्याने घसरण होत असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संतप्त झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव (Lasalgaon Bajar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखले
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही (Onion Production Cost) वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त करत आहेत तर अनेकजण फुकटात कांदा घेऊन जा असे आवाहन करत शेतकऱ्याची व्यथा मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgaon Onion Market) आवारात सकाळी कांद्याचे लिलाव (Onion Auction) रोखण्यात आले. हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी यावेळी आक्रमक पवित्र घेत सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले : व्यापारी
सततच्या कांदा दरात होत असलेल्या घसरणीमुळे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन सुरु केले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा लिलाव बंद पाडला. कांद्याला योग्य भाव द्यावा, अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. कांद्याला एक आणि दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने सतत कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा लिलावा बंद पाडला असून कांद्याला योग्य तो हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कांद्याचे भावात घसरण होत असल्याची माहिती कांदा व्यापारी यांनी दिली आहे.
केंद्र, राज्य सरकार, नाफेडविरोधात घोषणाबाजी
दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील वणी (Wani) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर (Shirdi-Surat highway) आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे, द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिला. तर आज लासलगावमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकार, तसेच नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.