Nashik Gram panchayat : नाशिकमधील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान! 3474 उमेदवारांचा मंगळवारी फैसला
Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत.
Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यांतील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले असून 3 हजार 474 उमेदवारांचा मंगळवारी फैसला होणार आहे. आज सकाळपासून ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 68.61 टक्के मतदान झाल्यामुळे सायंकाळपर्यंत त्यात आणखी वाढ होत जवळपास 79.63 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चुरशीच्या निवडणुकीत 3 हजार 474 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मंगळवारी मतमोजणीतून होणार आहे.
राज्यातील 7 हजार 682 तर नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यात एकुण 196 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी लागल्या होत्या.त्यात 8 ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात 188 ग्रामपंचायतींसाठी 745 मतदान केंद्रांवर मतदान झाले. निवडणुकीत दोन हजार 897 उमेदवार सदस्य पदासाठी तर 577 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती असल्याने पोलीस यंत्रणेने अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. संवेदनशील केंद्रावर जादा बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासून बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत जवळपास ३० टक्के मतदान झाले. उमेदवारांसह समर्थकांनी आपले हक्काचे मतदान होईल, यासाठी धडपड केली. त्यामुळे
दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार लाख 18 हजार 824 मतदार आहेत. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एक लाख 36 हजार 714 स्त्री तर एक लाख 50 हजार 648 पुरूष अशा एकूण दोन लाख 87 हजार 362 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे दुपारपर्यंतच 68.61 टक्के मतदान झाले, तर सायंकाळी उशिरा पर्यन्त मतदानाची अंतिम आकडेवारी आॅनलाईन भरण्याचे काम सुरु होते. प्रशासनाच्या अंदाजानुसार जवळपास 87 टक्के मतदान झाले असावे असा अंदज व्यक्त करण्यात आला.
बिनविरोध ठरलेल्या 8 ग्रामपंचायती
तालुका ग्रा. पं नावे
बागलाण किकवारी बु, ढोलबारे, महड.
नाशिक कोटमगाव.
चांदवड नारायणगाव
कळवण जयपूर.
नांदगाव शास्त्रीनगर
दिंडोरी जालखेड
या मतदार संघात प्रतिष्ठा पणाला
नाशिक जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्ग्ज नेत्यांनी या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसेंचे मालेगाव, आमदार छगन भुजबळांचा मतदार संघ येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मध्ये निवडणुका लागल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका झाल्या आहेत.