Nashik Farmers : नाशिकहून मुंबईत द्राक्ष विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अधिकाऱ्यांकडून त्रास, व्हिडीओतून मांडलं गाऱ्हाणं
Nashik Farmers : नाशिकहून मुंबईला द्राक्ष विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला स्थानिक अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागल्याची घटना घडली.
Nashik Farmers : एकीकडे कांदा दरावरून (Onion Issue) शेतकरी आक्रमक झाला असून आता अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक (Grape Framers) शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच नाशिकहून मुंबईला (Mumbai) द्राक्ष विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला स्थानिक अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागल्याची घटना घडली. याबाबत शेतकऱ्याने केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल झाला आहे.
साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा, गहू, द्राक्ष या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. अशातच द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. अवकाळीमुळे द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला असून अनेक भागात द्राक्ष मण्यांना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशातच आपली गोड द्राक्ष मुंबईकरांना खाऊ घालण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला स्थानिक अधिकाऱ्यांच्या दांडगाईला सामोरे जावे लागले आहे. नाशिकच्या चांदवडजवळील दरसवाडी (Nashik Farmer) येथील गोविंद निवृत्ती डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग व्हिडीओच्या माध्यमातून कथन केला आहे. यावेळी शेतकऱ्याला संबंधित अधिकाऱ्यांनी दोन ते तीन तास वेठीस धरल्याचे या शेतकऱ्याने व्हिडीओद्वारे सांगितले.
गोविंद डोंगरे (Govind Dongre) हे आपल्या पिकअप वाहनातून द्राक्ष घेऊन नाशिकहून मुंबईत गेले होते. नवी मुंबई परिसरात त्यांनी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना पाहून आपली पिकअप गाडी उभी केली होती. स्थानिक नागरिकांनी देखील शेतकऱ्याने थेट घरापर्यंत ताजी द्राक्ष उपलब्ध करुन दिल्याने चांगलाच प्रतिसाद देत होते. मात्र, त्याचवेळी स्थानिक पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आले. त्यांनी एवढी द्राक्ष कुठून आणली? रस्त्यात गाडी उभी करुन ट्रॅफिक जॅम का करत आहात? असे प्रश्न विचारुन थेट पिकअप वाहनाला जॅमर लावला. सकाळी आठ वाजेपासून ते थेट अकरा वाजेपर्यंत या शेतकऱ्याला त्यांनी वेठीस धरले. अशावेळी शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, साहेब मी नाशिकचा शेतकरी असून माझ्या नावावरच ही गाडी आहे. माझ्या नावाचा सातबारा उतारा सुद्धा आहे. ही द्राक्षे माझ्या शेतातील असून आज सकाळी इथे येऊन ट्रॅफिकला कोणताही अडथळा न आणता द्राक्ष विक्री आहे."
तब्बल तीन तास वेठीस धरले....
दरम्यान अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे काही एक ऐकून न घेता थेट गाडीतील द्राक्षाचे कॅरेट ओढले आणि तुम्हाला पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये दंड भरावा लागेल, अशी सूचना केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी यानंतर व्हिडीओ करुन आपली झालेली व्यथा मांडली. अशावेळी एकीकडे उन्हाचा कहर दुसरीकडे माल विकण्यास अधिकाऱ्यांनी केलेला मज्जाव यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. शेतकऱ्याने अधिकाऱ्याचे थेट पाय पडण्याची भूमिका घेतली तरीही कायद्याची भाषा करत अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. बराच वेळानंतर अधिकाऱ्यांनीही आमच्या हद्दीत माल विकता येणार नाही असे आदेश असल्याचे सांगत पुन्हा येऊ नका म्हणून सल्ला देत शेतकऱ्याला सोडून दिले. तब्बल दोन-तीन तासांनंतर अधिकाऱ्यांनी ओढल्यामुळे खराब झालेली द्राक्ष घेऊन शेतकरी माघारी फिरला.
शेतकऱ्याने करायचं काय?
एकीकडे सरकार म्हणतंय हे शेतकऱ्यांचे सरकार, मात्र दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कांद्याला भाव नाही, अवकाळीमुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले. आता शेतकरी थेट ग्राहकांपर्यत माल पोहोचवतोय, अशा परिस्थितीत शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्याने काय करायचं असा सवाल या घडलेल्या प्रसंगामुळे उपस्थित होतो आहे. तरी देखील शेतकऱ्याने एक शब्दही अधिकाऱ्यांबद्दल न उच्चारता खराब झालेली द्राक्ष घेऊन पुन्हा नाशिकला माघारी परतला.
सांगा काय करायचं शेतकऱ्याने! स्वखर्चाने नेऊन, कुणालाही कुठलाही त्रास न देता द्राक्ष विक्रीसाठी #नाशिक हून #मुंबई गाठले, मात्र इथंही त्यांना अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागला. #Nashik #Mumbai #Grapes pic.twitter.com/7hdwWZybI6
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) March 10, 2023