Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगी देवस्थानच्या व्यवस्थापनाविरोधात स्थानिकांचे आंदोलन, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी
Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगी देवी मंदीर व्यवस्थापनांवर स्थानिक गावकऱ्यांनी रोष व्यक्त करत आंदोलन केले आहे.
Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगी देवस्थानच्या (Saptshrungi Devi) व्यवस्थापना विरोधात सप्तशृंगी गड बंद ठेवण्याचा निर्णय झाला. व्यवस्थापनाकडून सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत गडावरचे दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील महत्वाचे देवस्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshrungi Devi Mandir) चर्चेत आले आहे. सप्तशृंगी देवी मंदीर व्यवस्थापनांवर गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला असून या पार्श्वभूमीवर बंद पाळत आंदोलन केले आहे. त्यामुळे सध्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यानी या ठिकाणी भेट दिली असून आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टने नोकरीभरती करताना स्थानिकांना प्राधान्य न देता इतरांची नियुक्ती करून स्थानिकांच्या वेतनापेक्षा अधिक वेतन संबंधित नाव नियुक्त कर्मचाऱ्यांना दिले असल्याचा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आज सप्तशृंग गडावर येऊन स्थानिकांनी दुकाने बंद करत निषेध व्यक्त केला.
गेल्या काही दिवसापूर्वी इथे सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते जुने सुरक्षा रक्षक देवस्थानचे आहे. त्यांच्यापेक्षा जास्त वेतन यांना दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे नवीन लोकांना त्यावेळेस गावातील नागरिकांचा तिथल्या तरुणांचा विचार केला असता तर अधिक बर झाल असते अशी भावना आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर व्यवस्थापनासंदर्भात अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. देवस्थान व्यवस्थापन कुठल्याही कामांमध्ये स्थानिकांना विचारात घेत नाही. व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मनमानी कारभार केला जातो, अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते.
दरम्यान एकत्रित असंतोष आज उफाळला असल्याने ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलेला आहे. सर्व व्यवहार तिथले बंद ठेवत ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून व्यवस्थापनाविषयी घोषणाबाजी दिली. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच अप्पर जिलाधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिल्याचे समजते. यानंतर आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे सांगितले आहे. यानंतर स्थानिकांनी आंदोलन मागे घेतले.
भाविकांना सुरक्षारक्षकाकडून गैरवर्तन
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. नोव्हेंबरमध्ये सुट्टीच्या निमित्ताने गडावर दर्शनासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भाविकांना देवीचे दर्शन न घेताच गाभार्यात महिला पुरुषांसह येथील सुरक्षारक्षकांकडून, सेवेकरी यांच्याकडून धक्के देऊन बाहेर काढून देत असल्याचे आरोप भाविकांकडून केले जात आहे. अनेकदा देवीच्या गाभार्यातील कर्मचारी दर्शन न करू देता हाताला धरून ढकलुन देतात. त्यामुळे योग्य नियोजन नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थनिकांनी केला आहे.