(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Jitendra Avhad : आता हे बंद करा, एकासाठी वेदोक्त, दुसऱ्यासाठी पुराणोक्त कशासाठी? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
Nashik Jitendra Avhad : वर्ण व्यवस्था अद्यापही अशा प्रकरणांमधून दिसून येत आहे, ही केविलवाणी गोष्ट असल्याची खंत जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली.
Nashik Jitendra Avhad : वर्ण व्यवस्था अद्यापही अशा प्रकरणांमधून दिसून येत आहे, ही केविलवाणी गोष्ट आहे. ही वर्णव्यवस्था आम्हाला मान्य नाही. म्ह्णूनच आमही नेहमी याविरोध आवाज उठवत असतो. पण आता हे बंद करायला हवं, एकासाठी वेदोक्त, दुसऱ्यासाठी पुराणोक्त कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी उपस्थित केला आहे.
दोन दिवसांपासून नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिर आणि वेदोक्त आणि पुराणोक्त या दोन पूजा विधीच्या पद्धतीवरून राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती (sanyogita Raje Chatrapati) यांच्या पोस्टनंतर या वादाला तोंड फुटले. त्यांनतर या वादात जितेंद्र आव्हाड यांनी देखील उडी घेत या प्रकरणावर सडकून टीका केली आहे. तसेच संयोगिताराजे छत्रपती यांचे समर्थन करत अशा अपप्रवृतीना धडा शिकवणे गरजचे असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचबरोबर आज ते नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आले. यानंतर त्यांनी मंदिरात संविधानाची प्रत ठेवत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले कि, आता हे बंद करायला हवं, एकासाठी वेदोक्त, दुसऱ्यासाठी पुराणोक्त कशासाठी? ही वर्णव्यवस्था आम्हाला मान्य नाही. आम्ही पण याच धर्माचा भाग आहोत, मग धर्मात समानता येऊ द्या, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित करत या वर्णाश्रमाने तर देशाचं वाटोळं लावलं, शिक्षणाने मागे राहिलो, त्याचही कारण वर्णव्यवस्था असल्याचे आव्हाड म्हणाले. वर्णव्यवस्था नसती तर बहुजनांची पोर शिकली असती, त्याचबरोबर शिक्षणाची दारे सर्वाना खुली असती तर इतर समाजातील लोक वेद शिकले असते. मात्र तसे झाले नाही, पण आता संधी आहे. सर्वाना वेड शिकू द्या, संविधानाची समानता धर्मात सुद्धा आणा, असे आमचे म्हणणे आहे.
भेदभाव नष्ट करा, अनेक समाजसुधारकांचे म्हणणे..
ते पुढे म्हणाले कि, भेदभाव नष्ट करा, हे गोपाळ गणेश आगरकर पासून गोपाळ कृष्ण गोखलेपर्यंत सर्वांचे म्हणणे होते. तसेच वेदोक्त प्रकरण बाहेर काढणारे राजाराम शास्त्री भागवत हे देखील पुरोगामी विचारांचे ब्राम्हणच होते. भागवत यांनीच शाहू महाराजांना सांगितले की तुम्ही क्षत्रिय आहेत, तुम्हाला वेदोक्त मंत्र लागू होतात. मात्र शाहू महाराजांना व्हॉईस रॉयपर्यंत जाऊन स्वतःच क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं, अशी शोकांतिका होती, आहे. आज काळाराम मंदिराच्या महंतांना भेटायचं होत, पण ते नाहीत असा निरोप आला, माझी बुद्धी किती छोटी हे त्यांना भेटून समजले असते, पण संधी आम्हाला मिळाली नसल्याचे आव्हाड म्हणाले.
आम्हालाही वेद शिकायचेत....
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी जोरदार टीका करत व्यवस्थेला धारेवर धरले. ते म्हणाले की, आजच्या धर्म व्यवस्थेनुसार एक सर्वोच्च सोडलं, तर बाकी सगळे शूद्र आहेत. काल संयोगीता राजे यांच्या सोबत हेच घडले, त्यातून पुन्हा एकदा ते सिद्ध झाले. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर, महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर अशा सगळयांना त्रास दिला. वर्णव्यवस्थेमुळे महिलांनाही त्रास झाला, त्यांनाही शिक्षणापासून दूर ठेवले गेले. आता तरी बहुजन समाजाने शहाणे व्हावे आणि बेदोक्त पद्धतीने पूजा करावी. आम्हालाही वेद शिकायचेत असा आग्रह धरला पाहिजे. मी धर्माभिमानी हिंदू आहे, मी धर्मविरोधी नाही, पण मला भेद मान्य नाही.