Nashik Dholya Ganpati : पूर्वी ढोल्या गणपती गावाबाहेर होता, आता नाशिकच्या मध्यवर्ती भागात आलाय!
Nashik Dholya Ganpati : नाशिकच्या (Nashik) ढोल्या गणपतीचा (Dholya Ganpati) मूर्तीचा आकार विशालकाय असल्याने या गणेशाला ढोल्या गणपती म्हणून ओळखले जाते.
Nashik Dholya Ganpati : पूर्वीच्या काळी मंदिरे गावाबाहेर स्थापन होत असत. त्यामुळे ढोल्या गणपतीचे (Dholya Ganpati) मंदिरही नाशिक (Nashik) शहराबाहेर होते. म्हणजेच सध्याचा अशोकस्तंभ (Ashokstambh) परिसर शहराची हद्द होती. मात्र आता हेच मंदिर जागतिकीकरणामुळे शहराच्या मध्यभागी आले आहे. मूर्तीचा आकार विशालकाय असल्याने या गणेशाला ढोल्या गणपती म्हणून ओळखले जाते.
नाशिक (Nashik) जिल्हा हा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकचा गजबजलेला परिसर असलेल्या अशोकस्तंभ जवळ ढोल्या गणपतीचे मंदिर पाहायला मिळते. आजही हे मंदिर सुस्थितीत असून या मंदिराची स्थापना साधारण तीनशे वर्षापूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. शहराचे ग्रामदैवत म्हणून नाशिककरांचे श्रध्दास्थान असणारा श्री ढोल्या गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक या देवस्थानास येत असतात. तसेच या मंदिरात गणेश उत्सवही साजरा केला जातो. यावेळेस मंदिरात उत्सवाचे वातावरण असते. या मंदिराचे पिढीजात पुजारी म्हणून गायकवाड कुटुंबिय मंदिराची देखभाल करतात.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील अशोकस्तंभशेजारी गायकवाड वाड्यात ढोल्या गणपती विराजमान होता. हे पेशवेकालीन मंदिर असून मंदिराचा गाभाराही अठराव्या शतकात बांधण्यात आला आहे. मात्र कालांतराने वाडा जीर्ण झाल्याने समोरील बाजूस ढोल्या गणपतीचा जीर्णोद्धार पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आला. पूर्वी ही मूर्ती गोदावरीच्या काठावर असलेल्या टेकडीवर उत्खननात सापडल्याचे सांगण्यात येते. नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची या ढोल्या गणपतीवर अतीव श्रध्दा आहे. ढोल्या गणपती हे भाविकांककडून प्रेमापोटी लाडक्या गणेशास मिळालेले नाव. याच गणेशाला ‘लंबोदर’ किंवा ‘विशालकाय गणेश’ म्हणूनही ओळखले जाते.
अशी आहे ढोल्या गणपती मूर्ती
ढोल्या गणपती मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून मूर्तीचा आकार विशाल असल्याने गणपतीला ढोल्या गणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. पेशवेकालीन असलेल्या या मंदिरातील आकाराने भव्य असणारी गणेशमूर्ती अतिशय प्राचीन व आकर्षक आहे. ढोल्या गणपतीच्या मूर्तीची उंची 7 फूट उंच व 4 फूट रुंद आहे. नशिकचा ढोल्या गणपती म्हणजे गणपतीची सिंदूरचर्चित असलेले महाकाय बैठी मूर्ती आहे. मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची असून या मूर्तीला शेंदूर लावला जात असल्याने मूर्तीला शेंदरी रंग प्राप्त झाला आहे. मंदिराचा गाभाराही अठराव्या शतकात बांधण्यात आला आहे.
..म्हणून ढोल्या गणपती हे नाव
नाशिक पूर्वी अशोकस्तंभ पर्यंत होते. त्यामुळे ढोल्या गणपतीचे मंदिरही गावाबाहेर होते. गावाच्या हद्दीबाहेर गणपतीसह मारुती, भैरवनाथ या ग्रामदैवतांची मंदिरे स्थापन करण्याची परंपरा पूर्वी गावाच्या रचनेत होती. विविध प्रकारच्या आपत्तीपासून, संकटांपासून ही दैवते रहिवाशांचे रक्षण करतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. आता शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आले आहे. गणेश मूर्तीचा आकार मोठा असल्याने त्यास ढोल्या गणपती म्हणून ओळखले जाते. तर मंदिराच्या घुमटाचा आकार हा मोदकासारखा आहे.