Nashik Ganeshotsav : 'अनुचित प्रकार घडू नये म्हणून! नाशिकच्या ग्रामीण भागातही विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र
Nashik Ganesh Festival : नाशिकमध्ये (Nashik) विसर्जनाला मूर्ती संकलन केंद्रे (Ganesh Immersion) उभारली जातात, याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही (Nashik District) मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत.
Nashik Ganeshotsav : नागरिकांनी येणारा गणेशोत्सव साजरा करतांना सतर्कता बाळगावी. तसेच गणरायाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घेत आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात. त्याचप्रमाणे संबंधित विभागांनी रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत केंद्रीय डॉ. पवार बोलत होत्या. नाशिक जिल्ह्यात 574 मंडळे असून लाखोंच्या घरात गणेशाची स्थापना होते. त्यामुळे मिरवणुकी बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातही तीन हजाराहून अधिक गणेश मंडळे आहेत, तर ग्रामीण भागात विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील जनजागृती होणे आवश्यक आहे.
डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरावस्था त्यात निर्माण झालेले खड्डे यामुळे नागरिकांना खूप त्रास होणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध असलेल्या निधीमधून तत्काळ रस्ते दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांच्या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे दर्जेदार असावीत. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी भर द्यावा, असेही डॉ. पवार यांनी सांगितले. जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे चांगल्या दर्जाची होण्यासोबतच वेळेत पूर्ण करण्यात यावीत. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेतील कामे करतांना ग्रामस्थांना विश्वासात घेवून कामे करण्यावर भर द्यावा. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमीनींचे पंचनामे करतांना कोणीही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे.
अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्तांमुळे काही ठिकाणी एस.टी. बसेस जाणे शक्य होत नाही. तेथे एस. टी. महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने एस.टी. सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर योजनेंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या 75 अमृत सरोवरांपैकी 47 सरोवरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या सरोवरांपैकी 4 ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले आहे. या सरोवरांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत सरोवर योजना असे फलक लावण्यात यावेत. वन विभागामार्फत ममदापूर येथील वनांचे संवर्धन करून नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून या वनांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात यावा. पर्यटनासाठी आवश्यक सोयी सुविधांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय त्यांनी दिल्या.
गणेशोत्सवाच्या काळात कोरोना तसेच साथरोग यांचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. गणपती विसर्जन मिरवणूकीत गर्दी होणार नाही तसेच कोणतीही दुर्घटना घडणार नाही यादृष्टिने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जनजागृती देखील करण्यात यावी. तसेच साथरोगांबाबत खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील माहिती घ्यावी. आयुष्यमान भारत योजनेंतंर्गत कार्ड वाटपाबाबत कॅम्प घेण्यात यावेत. त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भातील केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीचे फलक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रेफरल ऑडिटचे काम करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून याबाबत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले.
खतांची कमतरता नाही
दरम्यान अनेक भागातून तक्रारी येत आहेत की खतांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र प्रत्येक तालुक्यात गोदाम असून खतांचा स्टॉक असून काही ठिकाणी अडचणी येत असतील, मात्र खतांचा तुटवडा नसल्याचे मंत्री पवार यांनी सांगितले.
पोलिसांनी विशेष नियोजन करा
गणेशोत्सवात पोलिसांनी विशेष नियोजन करावे. सुरवातीला ऑनलाईन परवानगी दिली जाईल. त्यानंतर मिरवणुकीचा रुट आणि वेळ ठरवून दिली जाईल. ज्याप्रमाणे शहरी भागात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जातात. किंवा स्टॉल उभारून मूर्ती संकलित केली जाते. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात देखील स्टॉल उलब्ध करून दिले जाणार आहेत. विसर्जनाच्या ग्रामीण भागात अनेकदा अनुचित घटना उघडकीस येतात. हे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. शिवाय धोकादायक ठिकाणी पोलिसांची कुमक , सूचना फलक, जनजागृती आदी करण्यात येणार आहे.