Nashik News : नाशिकमधून विक्रीसाठी पाठवलेली दहा लाखांची द्राक्षे पळवली, पंचवटी पोलिसांत तक्रार
Nashik News : नाशिकमधील द्राक्षं व्यापाऱ्याचा दहा लाखांचा माल परस्पर विक्री केल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे.
Nashik News : एकीकडे द्राक्षांची निर्यातीला (Grapes export) चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहेत. मात्र दुसरीकडे द्राक्ष खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील द्राक्षं व्यापाऱ्याने दहा लाखांचा माल दुसऱ्या व्यापाऱ्याकडे पोहचण्यासाठी दिल्यानंतर हा मालच परस्पर विक्री केल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे.
नाशिकच्या (Nashik) हिरावाडीत राहणारे व्यापारी करणजित सिंग औलक यांचे पंचवटी मार्केट परिसरात ट्रान्स्पोर्टचे दुकान आहे. शेतकऱ्यांकडून द्राक्षांची खरेदी करून तो माल इतर राज्यात विक्री केला जातो. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल दुकानात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पाठवण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये लोड करण्यात आला. यात जवळपास दहा लाख 42 हजार रुपयांची द्राक्ष होती. यात काळ्या द्राक्षांचे 985 कॅरेट एकूण सात लाख 18 हजार रुपये किंमतीचे, त्यानंतर हिरव्या द्राक्षांचे 451 कॅरेट एक लाख 86 हजार रुपये किमतीचे, तर 1373 प्लास्टिकचे कॅरेट एक लाख 37 हजार रुपये किमतीचे असे एकूण दहा लाख रुपये किमतीची द्राक्ष ट्रकमध्ये ठेवण्यात आली.
त्यानंतर ट्रक रवाना झाला. साधारण 21 फेब्रुवारी ते 25 दरम्यान ट्रक बाबत माहिती शकली नाही. किंवा संबंधित ट्रकचालकाशी सपंर्क होऊ शकत नसल्याने औलक यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दिली आहे. औलक यांच्या तक्रारीवरून रामणजीत सिंग सिंधू, तर्क मालक जकतार सिंग व विक्रमजीत सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तक्रारदार औलक हे गेल्या अनेक वर्षांपासून संबंधितांना द्राक्ष माल पुरवत होते.
फसवणुकीच्या अनेक घटना
दरम्यान नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकरी असून मात्र अनेकदा व्यापारी विश्वास संपादन करून फसवणूक करतात. अशावेळी द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना थोडे पैसे देऊन व्यापारी द्राक्षे घेऊन जातात. त्यानंतर पाच-पन्नास लाखांची फसवणूक करून दलाल पळून गेल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होते, पोलिसात तक्रारी दाखल होतात, मात्र तपास होत नाही. कारण फसवणूक करण्यासाठीच आलेल्या या दलालांची साधे पूर्ण नाव माहीत नसते. पत्ता माहित नसतो, असला तरी पत्ता खरा असेल याची काही खात्री नसते. मग त्यांचा शोधायचे कोठे असाही पोलिस प्रशासनासमोर प्रश्न असतो. शेतकऱ्यांना द्राक्ष वेळेत विकण्याची गडबड असते. मध्यस्थ एखादा भागातीलच असतो, याचा पद्धतशीर फायदा हे भामटे उचलतात आणि पळून जातात.