Nashik Swine Flu : नाशिकमध्ये कोरोनानंतर स्वाईन फ्ल्यूचे संकट! ऑगस्ट महिन्यात अकरा जणांचा मृत्यू
Nashik Swine Flu : नाशिक (Nashik) शहरात कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्यू (Swine Flu) हात पाय पसरत असून मागील दोन महिन्यात 79 रुग्ण आढळून आले तर एका महिन्यात अकरा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Nashik Swine Flu : नाशिक (Nashik) शहरात कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्यू (Swine Flu) हात पाय पसरत असून मागील दोन महिन्यात 79 रुग्ण आढळून आले तर एका महिन्यात अकरा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनानंतर (Corona) नाशिककरांवर हे दुसरे संकट आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक (Nashik) शहरात सध्या पावसाची रिपरिप (Rain) सुरु असून अशातच अनेक साथ रोगांनी डोके वर काढले आहे. त्यातच शहरात स्वाईन फ्लूचा (Swine Flu) धोका वाढत असून मागील दोन महिन्यात नाशिकमध्ये जवळपास 79 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता ऑगस्ट महिन्यात अकरा मृत्यू झाले आहेत. अहवाल आता प्राप्त होताच स्वाईन फ्लू मुळे दगावल्याच समोर आले आहे.
एकीकडे मागील दोन वर्ष कोरोना (Corona Crisis) काळात गेल्याने आता कुठे नागरिक मोकळा श्वास घेत आहेत. मात्र अशातच पुन्हा शहरात साथ रोग पसरू लागले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी खड्डे झाल्याने पावसाचे पाणी त्यात साचून राहत असल्याने डासांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डेंग्यू मलेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू आदी आजारांनी नाशिकरांना ग्रासले आहे. त्यातच स्वाईन फ्ल्यू झपाट्याने हात पाय पसरत आहे. दुसरीकडे कोरोना आणि स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे समान असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
ऑगस्ट महिन्यात 64 रुग्ण
दरम्यान स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढल्याने नाशिक आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्ल्यू तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या रुग्णांना त्वरित डॉक्टरांना दाखविणे आणि तपासणी करून घेणे बंधनकारक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या तपासणीत स्वाईन फ्ल्यूचे जवळपास 64 रुग्ण आढळून आले आहेत.
स्वाईन फ्ल्यूचा स्वतंत्र कक्ष
नाशिक शहरात स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र स्वाईन फ्ल्यू कक्ष उभारण्यात आला आहे. स्वाईन फ्ल्यू हा सामान्य फ्ल्यू सारखा असल्याने याची लक्षणे सामान्य तापासारखीच आहेत. खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्ल्यूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तुंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
काळजी घेण्याचे आवाहन
दरम्यान ऑगस्ट महिन्यात अकरा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यु झाला आहे. यामध्ये मृतांमध्ये नाशिक शहर 3, नाशिक ग्रामीण - 4, अहमदनगर - 3 आणि पालघरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. स्वाईन फ्ल्यू झाल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा, छातीत खूप जास्त दुखत असेल, स्नायू दुखत असतील, तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.