Nashik Trimbakeshwer : आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार! डॉक्टर आणि कर्मचारी सुट्टीवर, आईनं केली मुलीची डिलिव्हरी
Nashik Trimbakeshwer : एकीकडे डिजिटल इंडियाचे कॅम्पेन केलं जात असताान दुसरीकडे शेतकरी, सामान्य वर्ग आजही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरत आहे.
![Nashik Trimbakeshwer : आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार! डॉक्टर आणि कर्मचारी सुट्टीवर, आईनं केली मुलीची डिलिव्हरी maharashtra news nashik news Doctor staff on leave mother gave birth to pregnant woman in trimbakeshwer Nashik Trimbakeshwer : आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार! डॉक्टर आणि कर्मचारी सुट्टीवर, आईनं केली मुलीची डिलिव्हरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/05/f636a57222fb9bd9149f39c98b7d323d1678009014081441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Trimbakeshwer : एकीकडे सरकार स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त असताना, भारत डिजिटल इंडिया होताना दुसरीकडे शेतकरी, सामान्य वर्ग आजही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरत आहे. भारतानं तंत्रज्ञानापासून ते अवकाशापर्यंत भरारी घेतली. पण आजही अनेक तालुका, जिल्ह्यात साधा रस्ता, आरोग्याच्या सुविधा पोहचवू शकल्या नसल्याची खंत आहे. याचा फटका नेहमीच सामान्य नागरिकाला सहन करावा लागत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. नुकतीच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer) तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे जवळील बरड्याचीवाडी येथील एक महिला डिलिव्हरीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
आरोग्य अधिकारी व कर्मचारी गैरहजर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती कळा जाणवत असल्याने आज सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
कशाला हवाय महिला दिन?
दरम्यान, या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच परिस्थिती असून एकही डॉक्टर मुख्यालय राहत नाही. त्यामुळे येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मधे यांनी सांगितले. एकीकडे काही दिवसांवर महिला दिन आला असून या दिवशी मोठ्या उत्साहात महिलांचा मान, सन्मान केला जातो. याच कार्यक्रमात महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून आज कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नसल्याचे ठासून सांगितले जाते. मात्र ग्रामीण भागातील ही विदारक परिस्थिती त्या महिलांना, प्रशासनाला दिसून येत नाही. घटना घडल्यानंतर माणसुकीचा आव आणला जातो, मात्र हे शहरातील महिलांनी जर ग्रामीण भागातील महिलांसाठी भरीव योगदान दिले किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तर अशा घटना घडणार नाहीत, मात्र सद्यस्थितीत हे चित्र बदलणं फार गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)