Diwali Ration Kit : नाशिकमध्ये आनंदाचा शिधा पोहचला, त्र्यंबक, सिन्नर आणि चांदवडकरांची दिवाळी
Diwali Ration Kit : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
Diwali Ration Kit : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha)अखेर नाशिक जिल्ह्यात पोहचला असून यंदाच्या दिवाळीला हा शिधा लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सध्या सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. त्याचबरोबर सिन्नर आणि चांदवड तालुक्यातही टप्पाटप्याने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे समजते.
दिवाळीसाठी (Diwali 2022) शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) आजपासून लोकांपर्यंत पोहोचेल असं आश्वासन अन्न व नागरीपुरवठा मंत्र्यांनी दिलं. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात तरी आनंदाचा शिधा पोहचला असून जनसामन्यांपर्यत पोहचवण्याचे काम सुरू झाले आहे. दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा सरकारनं केली. या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत. दरम्यान या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने अद्याप अनेक जिल्ह्यांत आनंदाचा शिधा पोहचला नसल्याचे समजते आहे.
दरम्यान कोरोना काळात दोन वर्षे अडचणींचा सामना करीत लाखो कुटुंबांनी उदरनिर्वाह भागविला. तर कोरोना काळात रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना देखील अन्न धान्य कमी रुपयांत वाटण्यात आले. त्यानंतर आता सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीसाठी रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने एक लिटर तेल, चणाडाळ, रवा व साखर (प्रत्येक एक किलो) अवघ्या शंभर रुपयांत दिले जाणार आहे. चारही वस्तू एकत्रितपणे वितरीत करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आनंदाच्या शिधा साहित्याचे एकूण 8 लाख लाभार्थी असून त्यासाठी 32 लाख शिधा पाकिटांची गरज आहे.
आजपासून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह सिन्नर आणि चांदवड तालुक्यात हे शिधा वाटप केले जाणार आहे. हे किट ज्या पिशव्यांमधून दिले जाणार आहे, त्या पिशव्याचे प्रमाण कमी असले तरी योग्य ती व्यवस्था केली जाईल असे प्रशासनाच म्हणणं आहे. हे किट वाटपाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील एकूण 15 पैकी त्र्यंबक, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यात वाटप केले जाणार आहे. एकंदरीतच दिवाळी तोंडावर आली असतांना जिल्ह्यातील सर्व आठ लाख लाभार्थ्यांपर्यंत किट पोहोचेल की नाही? हा प्रश्नच आहे. सध्या तरी जिल्ह्यात पामतेल 40 टक्के, साखर 20 टक्के, चणाडाळ 9 टक्के प्राप्त झाली आहे, तर रवा फक्त 2 टक्के प्राप्त झाल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वरला आनंदाचा शिधा वाटप
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात आजपासून आनंदाचा शिधा वाटपाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील रेशनकार्ड धारकांसाठी त्र्यंबकेश्वर बडा उदासीन आखाडा येथे अकरा वाजेपासून आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरवात झाली आहे. तर तालुक्यातील अनेक गावांना आनंदाचा शिधा पोहचला असून वाटप करण्याचे आदेश दिल्यानंतर हा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितले.