(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : मालेगावात पुन्हा हरणांची तस्करी; फार्महाऊसवर पोलिसांची कारवाई, समोर आला धक्कादायक प्रकार
Nashik Crime : मालेगाव पोलिसांनी एका फार्महाऊसवर टाकलेल्या (Malegaon Police) छाप्यात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक भागात हरणांचा (Deer) मोठा वावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हरणांची संख्या कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेकदा वाहनांच्या धडकेत हरणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मालेगाव पोलिसांनी एका फार्महाऊसवर टाकलेल्या (Malegaon Police) छाप्यात तब्बल सहा हरणांचे मांस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या येवला (Yeola), नांदगाव परिसरातील (Nandgoan) ममदापुर भागात हरणांची संख्या विलक्षण आहे, मात्र गेल्या काही दिवसांत या परिसरासह जिल्ह्यातील इतर भागातील हरणांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. अशातच मालेगाव (Malegaon) शहरातील पवारवाडी हद्दीतील एका फार्म हाउसवर पोलिसांनी छापा टाकून सहा हरणांचे शीर आणि 120 किलो मांस जप्त केले आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघे फरार आहेत. याशिवाय संशयितांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुसासह धारदार कोयता असा एकूण दोन लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालेगाव परिसरात सर्रासपणे हरणांची शिकार केली जात असल्याचे या कारवाईतून उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान रविवारी सकाळी 9. 30 वाजेच्या सुमारास पवारवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी हद्दीतील दरेगाव -शिवारात एका मदरशाजवळील एका फार्म हाउसवर ही कारवाई केली. हे फार्म हाऊस हा मोहंमद आमीन मोहंमद हारुण अन्सारी यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत सहा हरणांचे शीर व 120 किलो मांस, गावठी कट्टा, जिवंत काडतूस, कोयता, दुचाकी असा दोन लाख 52 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यापूर्वीही मालेगावात हरणांची तस्करी
दरम्यान पोलिसांनी या कारवाईत शेख शब्बीर शेख, शौकत हुसेन निसार अहमद, दानिश या तिघांना ताब्यात घेतले असून मोहमद आमिन मोहंमद हारुण अन्सारी, मुदस्सीर अकिल अहमद हे दोघे फरार झाले आहेत. या कारवाईत पाच जणांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, अन्य दोघे फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी दिली आहे. यापूर्वी देखील मालेगावच्या पूर्व भागात हरणांची तस्करी होत असल्याबाबतचा व्हिडीओ 12 जानेवारी 2023 रोजी कारवाई करीत शर्जिल अंजुम या संशयिताच्या ताब्यातून हरणाचे मांस जप्त केले होते. या घटनेतील दोन संशयित फरार झाले होते. दरम्यान, मालेगावात हरणांची तस्करी होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.