Nashik Veer Savarkar : नाशिकमध्ये देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’, कसं असेल भगुरमधील थीम पार्क
Nashik Veer Savarkar : नाशिकमधील भगूर येथील स्वा. सावरकरांच्या जन्मस्थळी थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे.
Nashik Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, स्वा. सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिकमधील भगूर येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये (Nashik) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. भगूर (Bhagur) हे आजही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाते. भगूरमधील सावरकर वाडा येथे आयोजित कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 'स्वा. सावरकर आत्मार्पण दिना'निमित्त 26 फेब्रुवारी रोजी सकाळी भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अष्टभुजा देवीही पालखीही सहभागी असणार आहे. त्यानंतर सकाळी सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित 'सावरकर आणि मृत्यू' या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.
भगूरमधील या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच भगूर येथे बनत असलेले ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
भगूरच्या सावरकर वाड्याचे स्थानमाहात्म्य
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दि. 28 मे, 1883 रोजी भगूरमधील याच सावरकर वाड्यात झाला होता. बालपणापासूनच राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरांनी याच वाड्यात अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर ‘सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून 'मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. त्यानंतर पुढे सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक सुधारणेचे कार्य, काव्य व साहित्यातील योगदान व राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेला असीम त्याग, समर्पण, सोसलेल्या हालअपेष्टा आपण सर्वजण जाणतोच. स्वा. सावरकर हे आजही देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत.
राज्य सरकारचा पुढाकार
स्वातंत्र्यवीर स्वा. सावरकरांचे कार्य व विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यानिमित्ताने एक राष्ट्रीय विचार जागरण घडवण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. याच मोहिमेतून भगूर येथे होत असलेला 26 फेब्रुवारी रोजीचा हा कार्यक्रम महत्वाचा आहे. यानिमित्ताने प्रथमच राज्य सरकारतर्फे सावरकर विचार जागरणासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होत असल्याने नाशिकसह अनेक ठिकाणच्या सावरकरप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.