(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaskar Jadhav : संभाजी ब्रिगेड, शिवसेना युतीत उडाली वादाची ठिणगी, नाशिकमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावरून मतभेद
Bhaskar Jadhav : नाशिकमध्ये (Nashik) सावरकरांच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड, ठाकरे गटात मतभेद समोर आले आहेत.
Bhaskar Jadhav : संभाजी ब्रिगेड (Sabhaji Briged) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena) यांच्या तालुक्यातील महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय युतीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी असलेले मतभेद समोर आले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) आयोजित संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी व्यासपीठावरून वादग्रस्त विधान केल्यामुळे शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या संयुक्त कार्यक्रमात वादाची ठिणगी पडली.
संभाजी ब्रिगेडच्या राजकीय पदार्पणाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटात यांच्यात युती झाल्यानंतर अशा प्रकारचा हा पहिला संयुक्त मेळावा होत असल्याने या मेळाव्याला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यासह नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बरबने यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून वर्धापन दिन सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मत व्यक्त केले. त्याविषयी भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत स्वातंत्र्यवीर सावरकर व महापुरुषांविषयी आपल्यासारख्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे सुनावले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या तुरुंगाची आपण स्वतः पाहणी केल्याचेही नमूद केले.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले कि, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांची सध्या आघाडी झालेली आहे. याच संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य प्रवक्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गैर प्रकारचे वक्तव्य केलं. व्यासपीठावर माझ्यासारखा माणूस असताना ते वक्तव्य कदापि सहन करणार नाही. ते आपण मान्य करू शकत नाही. मुळामध्ये शिवसेनेची भूमिका ही सावरकरांच्या बाजूला खंबीरपणे उभी आहे. मात्र सावरकरांचा उपयोग काही पक्ष हा केवळ मतांकरिता, राजकारणाकरता करत आहेत. परंतु सावरकर हा शिवसेनेचा श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तिगत सावरकरांचा खूप मोठा विचारांचा भक्त आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेक छोटी-मोठी भाषणे देखील झालेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल साहित्य देखील बऱ्यापैकी वाचलेले आहे. आणि स्वातंत्र्य मिळण्याकरता म्हणून ही सशस्त्र क्रांती म्हणा किंवा जहालक्रांती म्हणा त्यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे आमच्यासारख्या तरुणांना भावतात. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या आयुष्यामध्ये 25-25 वर्षाची दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे, आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांना आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये इंग्रजांनी असं म्हटलं होतं की या सावरकरांना डांबून ठेवेल, सावरकरांचे विचार बंदिस्त करू शकेल, सावरकरांना त्यांच्या ध्येयापासून रोखू शकेल असा एकही जेल किंवा असा एकही कारागृह नाही असं इंग्रजांनी देखील म्हटलं होतं. त्या सावरकरांबद्दल सर्वांनीच आदर बाळगला पाहिजे, त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचे वक्तव्य करू नये आणि केलं तर ते आम्ही सहन करणार नाही, ते आम्हाला मान्य देखील होणार नाही अशी माझी भूमिका होती, माझी भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे, माझी भूमिका ही माझी आहे माझी भूमिका ही समस्त देशवासीयांची असली पाहिजे, असा माझा आग्रह असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.
संजय राऊत नाशिकचे संपर्कप्रमुख...
संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो. संजय राऊत हे या विभागाचे संपर्क प्रमुख आहेत. उद्धव साहेबांनी या विभागाची जबाबदारी दिलेली आहे. म्हणून ते पक्ष बांधणी करता येत असावेत. जेलमधून सुटल्यानंतर ते प्रथमच नाशिकला येत असावेत. त्यामुळे नाशिक शिवसेनेमध्ये आणि ज्यांना ज्यांना म्हणून सध्याचा चाललेला अन्याय मान्य नाही, त्यांच्यामध्ये खूप मोठा जोश आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमध्ये येत असून आज मोठ्या जल्लोषात नाशिक नगरीमध्ये त्याच शिवसैनिक करतील.