Nashik News : 'नो पार्किंग'मध्ये नसताना वाहन उचललंय, मग इथं संपर्क करा, नाशिक ग्राहक मंचचा मदत कक्ष
Nashik News : नाशिक (Nahsik) शहरात बेकायदेशीर वाहन (Towing Van) उचलणाऱ्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी आता ग्राहक मंच (Customer Forum) वाहनधारकांच्या पाठीशी उभे राहणार आहे.
Nashik News : नाशिक (Nahsik) शहरात वाहतूक कोंडीची (Road Traffic) समस्या नित्याची झाली आहे. त्यामुळे अनेकदा आपण नो पार्किंगमध्ये (No Parking) गाडी उभी करून बाहेर पडत असतो. अशावेळी वाहतूक शाखेकडून (Traffic Police) सुरु करण्यात आलेल्या टोईंग व्हॅन तुमचे वाहन टोईंगच्या माध्यमातून उचलून नेत असते. किंवा पावती फाडण्यासाठी सांगितले जाते. तर काहीवेळा वाहन नो पार्किंगमध्ये नसताना देखील वाहन उचलण्याचे प्रकार समोर आले आहेत, आता अशा बेकायदेशीर वाहन उचलणाऱ्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी आता ग्राहक मंच वाहनधारकांच्या पाठीशी उभे राहणार आहे.
नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही वर्षांपासून टोईंग व्हॅनचा प्रकार सुरु झाला आहे. तत्पूर्वी या टोईंग व्हॅन लागू करण्यासाठी अनेकदा सर्वेक्षणही करण्यात आले. त्यांनतर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन नाशिक रस्त्यांवर टोईंग व्हॅन आली. नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेने हा उपक्रम सुरु केला. टोईंग व्हॅन च्या माध्यमातून सुरवातीला पोलिसांच्या समक्ष वाहन उचलले जाई. त्यामुळे संबंधित वाहनचालक निमूटपणे पावती फाडून मोकळा होत असते. मात्र त्यानंतर 'नो पार्किंग'मधील वाहने चालकासमोर उचलून टोइंगचे बेकायदा शुल्क उकळणे, वाहनचालक पावती करीत असेल, तरी गाडी 'टोइंग'चा आग्रह धरणे, गाडी उचलणाऱ्या तरुणांची अरेरावी हे सगळं वाढत गेले.
दरम्यान या पार्श्वभूमीवर आता अखिल भारतीय ग्राहक मंच (Customer Forum) उभा राहिला असून नाशिकच्या अशा वाहनधारकांना ग्राहक मंच न्याय मिळवून देणार आहे. यासाठी नाशिकचे अखिल भारतीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकांचे शोषण रोखण्यासाठी सजग नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत असून असंघटित ग्राहकांची संघटित शक्ती निर्माण करणे, ग्राहक प्रबोधनाद्वारे ग्राहकांच्या अधिकार आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. नो पार्किंगमधील वाहने टोईंग केली असल्यास संबंधित वाहदनधारकाने ग्राहक मंचाकडे तक्रार करून यावर उपपयोजना करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय ग्राहक मंच शहरामध्ये वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 'नो पार्किंग' मधील वाहने उचलणे आणि त्या पोटी पावत्या फाडणे या विषयांमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक वाटते. ग्राहक मंचने केलेल्या पाहणीत वाहतुकीला अडथळा न येणाऱ्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सर्रास संबंधित ठेकेदार उचलून नेत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी कुठेही 'नो पार्किंग'चा बोर्ड नव्हता. या गाड्या ज्या ठिकाणी पार्क केलेलल्या होत्या. त्याचा वाहतुकीला कुठेही अडथळा नव्हता, असा निष्कर्ष ग्राहक मंचने दिला आहे.
स्पीड मर्यादा गनचा बोजवारा
तसेच नाशिक शहरात येताना नाशिक मधील उड्डाण पुलावर आणि शहराच्या बाहेर जाताना 80 किमी स्पीड लिमिट असताना जिल्ह्यामध्ये ओझर, पिंपळगांव येथे सुद्धा अनेक ठिकाणी वाहनांचा वेग तपासणी करणारी स्पीड गन वेग मर्यादा न दर्शवता उभी असल्याचे निदर्शनास आले. नाशिक शहरातील उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी वाहनाचा वेग हा पाच किलोमीटर असा फलक दिसत आहे, कदाचित तो 50 असावा असा अशी शंका आहे. शून्य उडून गेल्यामुळे, किंवा कुणीतरी काढल्यामुळे स्पीड लिमिट किती आहे हे वाहन चालकांना समजत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना वेगाची मर्यादा पाळली गेली नाही म्हणून दोन हजार रुपये दंड लागत आहे.
ग्राहक मंचाकडून आवाहन
दरम्यान अशा पद्धतीने वाहनधारकांकडून पैसे उकळले जात आहेत. ग्राहकांच्या न्याय हक्कावर ही गदा असून रोड टॅक्स, टोल टॅक्स भरणाऱ्या ग्राहकांची ही फसवणूक आहे. दंड लावण्यासाठी वाहनाचा वेग तपासणारी स्पीड गन उभी करण्याआधी किमान 500 फुटावर स्पीड लिमिटचा बोर्ड असणे गरजेचे आहे. ज्या ग्राहकांना असा दंड आलेला असेल, त्या ग्राहकांनी हा दंड भरण्याआधी लोक अदालतीमध्ये या बाबी मा. न्यायालया समोर मांडाव्यात असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करीत आहे.