Nashik Congress Celebration : कर्नाटकात काँग्रेसचा विजय, नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा सिलेंडर उचलून जल्लोष
Nashik Congress Celebration : कर्नाटकात (Karnataka Election) काँग्रेस पक्षाला यश मिळाले असून नाशिक शहरात (Nashik) कार्यकर्त्याने सिलेंडर उचलून घेत नृत्य केले.
Nashik Congress Celebration : कर्नाटकात (Karnataka Election) काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोषात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. नाशिक शहरात (Nashik) देखील शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महागाईच्या मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसने (Congress) जल्लोषाच्या वेळी सिलेंडर समोर ठेऊन विजय साजरा केला. यावेळी एका कार्यकर्त्याने चक्क सिलेंडर उचलून घेत ढोल वादनावर नृत्यही केले.
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवली असून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निवडणुकीत 224 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज निकालाच्या दिवशी सकाळपासूनच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची विजयी घौडदौड सुरु आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाला 224 पैकी135 जागा जिंकण्यात यश आल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. शहर काँग्रेसच्या (Nashik Congress) माध्यमातून काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यानी एकत्र आनंद साजरा केल्याचे दिसून आले.
दरम्यान आज सकाळपासून विजयाचा जल्लोष काँग्रेस कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेसच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात विजयाचे स्वागत करण्यात आले. यावर उपस्थित काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले कि, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याच्या काम केले. महागाईला नागरिक त्रस्त झाले होते. त्याला विरोध म्ह्णून आज नागरिकांनी भाजपाला जागा दाखवली आहे. भारत जोडो यात्रेमुळे कर्नाटकात विजय मिळवला. भाजपकडून महागाई, बेरोजगारी, धर्माच्या नावावर राजकारण करण्यात आले. मात्र कर्नाटकच्या नागरिकांनी काँग्रेसला बहुमत दिले आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष एकजूट राहील, येथील नागरिकांनी काँग्रेसला बहुमत दिल आहे. मागील निवडणुकीच्या वेळी भाजपचे फोडाफोडीच राजकरण केलं, मात्र या निवडणुकीत नागरिकांनी भाजपाला हद्दपार केलं आहे. त्यामुळे 2024 ची ही सुरवात असून आगामी निवडणुकात भाजपचा सुफेद साफ झाल्याशिवाय राहणार नाही, अशा आशावाद छाजेड यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
दरम्यान कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या निकालावरून कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली असून कर्नाटकातील 224 जागांचा पूर्ण निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यात निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अभूतपूर्ण यश मिळाले आहे. यावेळी निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी करत कार्यकर्ते उत्साही झालेले पाहायला मिळाले. नाशिक शहरातही काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली जात असून ढोल ताशांच्या गजरात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी 'जिंदाबाद जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाज' अशा घोषणाही देण्यात आल्या.