Nashik Congress Protest : 'याचना नहीं अब रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा', नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे आंदोलन
Nashik Congress Protest : नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.
Nashik Congress Protest : देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी' अशी जोरदार घोषणाबाजी करत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून तीव्र आंदोलन (Protest) करण्यात आले. नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.
राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द केल्यानंतर राज्यभर काँग्रेस (Congress) आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकच्या शालीमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर कॉंग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येऊन मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपकडून दडपशाही आणि सुडाचे राजकारण करण्यात येत असून राहुल गांधींची खासदारकी परत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडून देखील राहुल गांधींच्या विरोधात शहरात आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येऊन तीव्र आंदोलन करण्यात आले.
राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले असून राहुल गांधी यांनी मोदी (Modi) आडनावावरून विधान केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राजकीय वातावरण तापले असून कालपासून देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी राहुल गांधींचे ज्या पद्धतीने लोकसभा सदस्य पद रद्द करण्यात आले. हे लोकशाहीला काळिमा फासणारे असून हे सूडबुद्धीच राजकारण आहे. राहुल गांधी हे देशाचा, जनतेचा आवाज आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिक जोडले गेले, अनेक घोटाळे बाहेर आले, तरीही भाजप सरकार हे घोटाळे करणाऱ्या नेत्यांना संरक्षण देत आरोप काँग्रेस आंदोलकाकडून करण्यात आला.
भाजपकडूनही आंदोलन
'सर्व चोरांचे आडनाव मोदीच असते का? असे वक्तव्य 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचार सभेत बोलताना त्यांनी केले होते. देशभरात मोदी या आडनावाच्या प्रतिष्ठित अनेक व्यक्ती आहेत. डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, खेळाडू यांचा समावेश आहे. एखादया आडनावाशी संबंधीत जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या व्यक्तीवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत असून भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने सिडको येथील त्रिमुर्ती चौकात त्यांच्या पुतळयास जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.