Nandurbar News : लग्न जमल्यानंतर नवरा नवरी विवाह सोहळ्याआधी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Photo) करण्याला पसंती देतात, जणू आजकाल प्री वेडिंग झाल्याशिवाय लग्न होतच नाही, असाच काहीसा सूर दिसून येत आहे. लग्नाआधीच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी प्री-वेडिंग शूट केले जाते. मात्र नंदुरबार (Nandurbar) मधील गुरव समाजाने (Gurav Community) मात्र प्री वेडिंगला विरोध दर्शवत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट झालेच पाहिजे, हे प्री वेडिंग फोटोशूट केल्याशिवाय जणू लग्नच पूर्ण होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेटवर (Pre Wedding) प्री वेडिंगचे अनेक फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. अनेकदा पर्यटनस्थळी, नदीकिनारी, मंदिराजवळ, कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशूट केले जाते. मात्र अनेकदा कुटुंबीय नातेवाईकांमुळे यास विरोधही केला जातो. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील गुरव समाजाने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे समाजात प्री वेडिंग शूट करण्यास बंदी लावण्यात येणार असून कमीत कमी पैशात लग्न उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबारला झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


नंदुरबार शहरात दोन दिवसीय दाहीगाव गुरव समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (VIjaykumar Gavit), शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा पार पडला. तत्पूर्वी गुरव समाजाची याबाबत बैठक होऊन त्यात अध्यक्ष सुधाकर रमेश गुरव यांनी प्री वेडिंग संदर्भांतील प्रस्ताव मांडला. सर्वांनीच तो तत्परतेने मान्य केला. प्री वेडिंग फोटोग्राफी करताना पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे वधूला घालायला लावणे आणि वर-वधूंच्या वैयक्तिक क्षणांचे फोटो काढणे, त्याचे प्रदर्शन लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर करण्यासाठी होत आहे. त्यामुळे प्री-वेडिंग शूटिंग आणि त्याचे मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपण याला यापुढे नकार द्यावा, असा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील गुरव समाजाने घेतला आहे...


साखरपुड्याचा कार्यक्रम थोडक्यात करावा... 


तसेच या बैठकीत इतरही अनेक ठराव करण्यात आले. यात साखरपुड्याचा कार्यक्रम थोडक्यात करावा, कमी लोकांना लग्नाला घेऊन जावे, फक्त पाचच साड्या घ्याव्यात, अनावश्यक खर्च वाचण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावा, मंदिरात लग्नास प्राधान्य द्यावे, लग्नात आहेर मोजके आणि जवळच्या नातेवाइकांना द्यावा, असे ठराव करण्यात आले. उत्तरकार्य करताना देखील जवळच्या नातलगांनाच टोप्या द्याव्यात, कारण त्या टोप्यानंतर पडून राहातात, असाही प्रस्ताव संमत करण्यात आला.