नंदुरबार: गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अनेक नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, हरभरा, गहू या पिकांसह मिरची, कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अनेक नद्यांना या अवकाळी पावसामुळे पूर आला आहे. धडगाव, अक्कलकुवा, शहादा तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसाळ्यात ज्याप्रमाणे नद्यांना पूर येतो, त्याचप्रमाणे या नद्या प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे.


नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका शहादा तालुका आणि अक्कलकुवा तालुका या तालुक्यांमधील नद्या अवकाळी पावसामुळे प्रवाहित झाले आहेत. नद्यांना पावसाळ्याप्रमाणे पूर आला असून नदीकाठच्या वस्ती गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.


मिरची, पपई पिकांचे नुकसान...


गेल्या 15 दिवसात तीन वेळा अवकाळी पावसाचे नैसर्गिक संकट तालुक्यातील शेतकऱ्यांवर आले आला आहे. तालुक्यात मिरचीची सुमारे एक हजार 522 हेक्टर क्षेत्रावर आहेत. त्यामुळे दीडशे हेक्टरपर्यंत मिरचीचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तवण्यात येत आहे, तर पपई चार हजार 95 हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. अवकाळी पावसामुळे पपई खाली पडल्याने तोड बंद आहे.


नाशिकमध्ये द्राक्षांना फटका


गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सलग पाच दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागातील गहू, हरभरा, द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. तब्बल दोन आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचा प्रचंड नुकसान झाले. अगदी रद्दीला मिळावा, याहीपेक्षा कमी मोल भाव द्राक्षांना मिळत आहे. 


राज्यभरात पिकांचे नुकसान 


राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचं अतोनात नुकसान झालं आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. आजच त्यांचाही संप मिटला आहे. त्यामुळे आता पंचनामे कधी सुरु होतील आणि नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.