Nashik Bajar Samiti : नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांसाठी (Bajara Samiti) होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये (Bajar Samiti Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वत्र मोठी गर्दी झालेली दिसून आली. या सर्व ठिकाणी एकूण 2421 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सुरगाणा (Surgana) बाजार समितीमध्ये सात जागा बिनविरोध झाल्या असून, केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठीची निवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (3 एप्रिल) हा अखेरचा दिवस होता, जवळपास सर्वच ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. या सर्व बाजार समित्यांसाठी 2438 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्याने यंदा निवडणूक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. बुधवारी (5 एप्रिल) या अर्जाची छाननी होणार असून, त्यानंतर माघारीसाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या बाजार समित्यांमध्ये किती उमेदवार?
शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये पिंपळगाव बसवंत बाजार (Pimpalgaon Bajar samiti) समितीमध्ये सर्वाधिक 309 उमेदवार रिंगणात असून, येवल्यामध्ये 217 उमेदवार आहेत. लासलगावला 211 तर मालेगावला 202 अर्ज दाखल आहेत. सर्वात कमी 25 उमेदवारी अर्ज सुरगाणा बाजार समितीमध्ये आहेत. बाजार समित्यांच्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होणार आहे. त्यानंतर उर्वरित उमेदवारांमधून कोण माघार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर एकट्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी 90 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. बाजार समितीच्या 18 जागांसाठी एकूण 175 अर्ज दाखल झाल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक बाजार समितीत तीन हजार मतदार
अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. डमी अर्जासह दिग्गजांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावाने देखील अर्ज दाखल करत सावधानता बाळगल्याचे दिसून आले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गेल्या 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि उमेदवारी अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरु झाली होती. पहिल्या दोन दिवसात केवळ तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यानंतर उमेदवारी अर्जाची विक्री आणि दाखल करण्याचे प्रमाणही वाढले. यानुसार सोसायटी गटात 11, ग्रामपंचायत गटात 4, हमाल मापारी गटात 1 तर व्यापारी गट 2 अशा एकूण 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत 2070 तर सोसायटी गटासाठी 1597 मिळून एकूण 3667 मतदार आहेत.