Nashik Rain : नाशिकचे रस्ते, 'नॉट ओके', चार दिवसांच्या पावसात रस्ते 'ऑक्सिजनवर'
Nashik Rain : नाशिक (Nashik) गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर विभागातील रस्त्यांची Road Potholes) चाळण झाली आहे.
Nashik Rain : नाशिक (Nashik) गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर इतर विभागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे सध्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय खड्डे पाण्यात असल्याने वाहने देखील वाहतुकीदरम्यान खिळखिळी झाली आहेत.
नाशिकसह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले. यात अनेक नदी- नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. अशातच नाशिक शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. शहरातील चार दिवसांच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सध्या नाशिककरांना पाण्यासह खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
नाशिक शहरात पावसाळ्यापूर्वी खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र या चार दिवसांच्या पावसात रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. शहरातील निमाणी बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, श्रीरामी विद्यालय, पेठरोड, तारवालानगर, राऊ हॉटेल परिसर, रविवार कारंजा यासह उपनगरातील रस्त्यांची या पावसामुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून खड्डे बुजवताना वापरण्यात आलेली खडीही अस्ताव्यस्त पडलेली दिसून येत आहे. यामुळे दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खड्डा आहे की नाही, हेही वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
रस्ते भारी, ते शहर भारी,
दरम्यान ज्या शहरातील रस्ते भारी, ते शहर भारी, असं म्हटले जाते. कोणत्याही शहराचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरातील रस्ते व्हेंटिलेटरवर असल्यासारखे भासत आहेत. शहरामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून पडत आहे. नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. नाशिकमध्ये थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडतात, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन घसरण्याचे प्रकार घडत आहेत.
पावसाळापूर्व कामांची वाताहात
नाशिक शहरातील काही भागात पावसाळापूर्व रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात आली. यामध्ये खडी टाकून रस्ते बुजवण्यात आले. अनेक ठिकाणी विना डांबर रस्त्यांची कामे करण्यात आली. चार दिवसांच्या पावसाळ्यात या कामांचा बोजवारा उडाला आहे. शिवाय पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.