Nashik News : मुंबई विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थनेसाठी जागा द्या, अन्यथा.. महंत अनिकेत शास्त्री यांचा इशारा
Nashik News : विमानतळावर मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) ओझर विमानतळाला (Ojhar Airport) जटायू असे नाव देण्याची मागणी करणाऱ्या महंत अनिकेत शास्त्री यांनी पुन्हा एकदा नवीन मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी अनिकेत शास्त्री (Mahant Aniket Shasri) यांनी केली आहे.
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी दोनच दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रातून लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी केली होती त्याचबरोबर फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा अशी मागणी करत मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करतो, असं चॅलेंजही अनिकेत शास्त्री यांनी दिलं होता. आता अनिकेत शास्त्री जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी केली आहे. अन्यथा मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अनिकेत शास्त्री जोशी यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लिहिले असून देश संविधानने चालतो. त्यामुळे सर्वाना समान अधिकार द्या. प्रत्येक धर्माला विमानतळावर पूजा विधी करण्यासाठी जागा द्या, सर्वच समाज त्या ठिकाणी जाऊन पूजा विधी करेल, फक्त एका समाजाला मुभा देणं चुकीच आहे. सध्या या ठिकाणी मुस्लिम समाज नमाज पठण करत असतो, त्यामुळे मुस्लिम समाजाला दिलेली नमाजाची जागा बंद करा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. इतर धर्मातील नागरिकांसाठी प्रार्थना करण्यासाठी जर जागा उपलब्ध करून देणार नसाल तर मुंबई विमानतळमध्ये असलेल्या नमाज स्थळ देखील बंद करण्याची मागणी अनिकेत शास्त्री जोशी यांनी केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक विमानतळाला जटायू नाव द्यावे...
दरम्यान महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या ओझर विमानतळाला जटायू असे नाव देण्याची मागणी केली होती. यामुळे नाशिक विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. कारण महंत अनिकेत शास्त्री यांच्या मागणी आधी नाशिकच्या विमानतळाला महापुरुषांचे नाव देण्याची मागणी झाली होती. त्यानंतर नाशिक विमानतळाला "जटायू" हे नाव देण्यात यावे, अशी मागणी झाली होती. मात्र कालांतराने ही मागणी देखील मागे पडली. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व धर्मियांना पूजा प्रार्थना करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.