Nashik News : बॉलिंग करताना गोलंदाज जागेवरच कोसळला, मित्रांनी तात्काळ दवाखान्यात नेलं, पण...
Nashik News : नाशिकमध्ये आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा सुरु असताना दुर्देवी घटना घडली आहे.
Nashik News : कधी कुणाला काय होईल हे सांगता येणं अवघड झाले आहे. हृदय विकाराच्या (Heart Attack) झटक्याचे प्रमाण आता तरुणांमध्येही जास्त दिसत आहे. अनेकदा खेळता खेळता तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत (Cricket Tournament) खेळत असताना 32 वर्षे युवकाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.
नाशिक (Nashik) शहरातील गंगापूर रोडवरील एनबीटी महाविद्यालयात ही घटना घडली आहे. या महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं .यावेळी सुरू असताना अचानक एका खेळाडूला चक्कर आल्याने तो मैदानात कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. आकाश रवींद्र वाटेकर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून क्रिकेट खेळतानाच निधन झाल्याने नाशिकच्या क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा लॉ कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होता. त्यांनी अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता. क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एनबीटी महाविद्यालयाच्या मैदानावर बॉलिंग करत होता. त्यावेळी त्याला शारीरिक त्रास सुरू झाला. ही बाब त्याने मित्रांना सांगत औषधाची गोळी मागितली. गोळी खाल्ल्यानंतर त्याला बरे वाटू लागले त्यांनी पुन्हा मैदानात येऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खाली कोसळला.
आकाश खाली कोसळल्याने मैदानावरील मित्राने तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याला उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करत त्याच मृत घोषित केले. त्याच्या पश्चात वडील, बहिण, भाचा असा परिवार आहे. मात्र आकाशच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
तरुणांनी हृदय जपलं पाहिजे...
खरे तर सध्या धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होऊ शकतो. अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे.