Nashik News : वडिलांना पाहताच आनंद झाला अन् भेटायला दुडूदुडू धावली, मात्र वाटेतच...
Nashik News : नाशिक शहरातील अपघातात अवघ्या वर्षभराचे आयुष्य पाहिलेल्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. अशातच नाशिक शहरातील एका अपघातात अवघ्या वर्षभराचे आयुष्य पाहिलेल्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघातात 14 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) पत्नीला उपचारासाठी नाशिकमध्ये घेऊन आलेल्या अमजद खान यांना बुधवारी (1 फेब्रुवारी) झालेल्या दुर्दैवी अपघातात (Accident) त्यांच्या अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकलीला गमावावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमजद खान यांच्या चिमुकल्या आयजा हिला रस्ता ओलांडताना एका चारचाकी वाहनाची अचानक धडक लागली. या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबड लिंक रोड भागात घडली आहे.
पत्नीच्या उपचारांसाठी उत्तर प्रदेशातील कुटुंबीय नाशिकमध्ये
उत्तर प्रदेशातील अमजद खान हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी चिमुकल्या मुलीसह नाशिक येथील विराटनगर अंबड लिंक रोड भागात नातलगाकडे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आले होते. एकीकडे पत्नीचे उपचार सुरु असताना दुसरीकडे आर्थिक बाजू कमजोर असल्याने अमजद खान यांनी त्यांच्या नातलगांसोबत अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मोलमजुरी करत होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अमजद यांची 14 महिन्यांची मुलगी आयजा अमजद खान ही घराबाहेर खेळत होती. यावेळी कंपनीतून सुटल्यानंतर अमजद हे घराकडे येत असल्याचे या चिमुकलीने पाहिले आणि ती वडिलांना भेटण्यासाठी रस्ता ओलांडत अमजद यांच्या दिशेने दुडूदुडू येत होती.
दरम्यान याचवेळी अचानक समोरुन आलेल्या वाहनाने चिमुकलीस जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली आयजा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. खान कुटुंबियांवर यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी चारचाकी पोलिसांनी संशयित कारचालक हसनेन मुज्जमिल खान यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुडूदुडू धावणारी पावले थांबली...!
कुठल्याही लहान मुलाला आपल्या वडिलांचा विशेष लळा असतो. त्यामुळे वडील दूरवर दिसले तरी लहान मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. वडील घराकडे येत असल्याचे पाहून चिमुकलीने वडिलांच्या दिशेने धाव घेतली. दुडदुड धावणाच्या आयजाकडे वडीलही कौतुकाने पाहत होते. मुलगी आपल्याजवळ पोहोचेल आणि दोघांची भेट होईल, असा ते विचार करत असतानाच अचानक समोरुन आलेले चारचाकी वाहनाने चिमुकलीला 'धडक दिली आणि सारे काही स्तब्ध झाले.