Nashik News : साल्हेर किल्ल्यावरून पडून मालेगावच्या तरुणाचा मृत्यू; एसपीनी जखमीला आणले पाठगुळी
Nashik Latest News : नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यात (Baglan taluka) साल्हेर किल्ल्यावरून (Salher Fort) पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Nashik Latest News : एकीकडे नाशिक वनविभागाने (Nashik Forest) पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणारा हरिहर गड (Harihar Fort), अनुचित प्रकार घडू यासाठी बंद करण्यात आला. तर दुसरीकडे बागलाण तालुक्यात (Baglan taluka) साल्हेर किल्ल्यावरून (Salher Fort) पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गड किल्ले आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिक जिल्ह्यात असंख्य गड किल्ले आहेत. अशातच सध्या पावसाचे दिवस असल्याचे गडकिल्ल्यावर मज्जाव असताना हौशी पर्यटक नियमांची पायमल्ली करीत किल्ल्यावर जात असतात. अशातच गर्दी होऊन अनुचित घटना घडतात. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले दोन हौशी पर्यटक किल्ल्यावरून पाय घसरून पडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी असून त्याच्या पायास गंभीर दुखापत झाल्याने रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यामुळे निसर्गपर्यटन वाढले आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ला देखील आता तितकाच विलोभनीय दिसून येत आहे. या किल्ल्यावर मालेगाव येथील काही तरुणांचा ग्रुप चढाईसाठी आलेला होता. या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथील अतिशय अवघड अशा 65 पायऱ्या आहेत. याच ठिकाणाहून जात असताना यात ग्रुपमधील भावेश शेखर अहिरे या तरुणाचा पाय घसरला. हा तरुण दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मनिष सुनील मुठेकर हादेखील याच ठिकाणाहून खाली कोसळला. मात्र सुदैवाने त्याला पायाला दुखापत झाली असून तो उपचार घेत आहे.
दरम्यान सोबत असलेल्या तरुणांची घटनेननंतर धांदल उडाली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती मालेगाव येथे दिली. यानंतर घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी धाव घेत मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मालेगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक उणी स्वतः चढाईकरून जखमीला आपल्या पाठीवर बसवून थेट किल्याच्या पायथ्याशी आणले. तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह किल्ल्याच्या मगरबारयाचा गणपती परिसरातून बाहेर काढण्यात आला.
धोक्याचे पर्यटन टाळा
दरवर्षी पावसाळ्यात गड किल्ले, धबधबे आदी परिसरात अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या कानावर पडतात. मात्र तरीही पर्यटक याकडे कानाडोळा करून पर्यटनस्थळी गर्दी करतात. किंवा साल्हेर घटनेप्रमाणे चढाईची बाजू माहिती नसतांना चढाई करतात. अशावेळी निसरड्या वाटवेरून खाली पडण्याचा धोका असतो. त्यामुळे पर्यटनस्थळी जाताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते.