संतोष गुप्ता यांच्यावर ' गांजा ' कारवाईने अन्याय, पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करावी; लक्षवेधीद्वारे मागणी
24 जूनला संतोष गुप्ता यांच्या दुकानात छापा टाकला असता 80 हजार रुपये किमतीचा ८ किलो गांजा मिळून आला होता.या कारवाईनंतर संतोष गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले होते..
नांदगाव: शिवसेना ठाकरे गटाचे नांदगाव (Nandgaon) तालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्या दुकानात सापडलेल्या आठ किलो ' गांजा' (Ganja) प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र ही कारवाई करतांना ' संतोष गुप्ता ' यांच्यावर अन्याय होऊ नये अशी मागणी आ.सुहास कांदे यांनी आज सभागृहात ' लक्षवेधी ' करत मांडली. गुप्ता हे गेली 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात असल्याने व व्यापारी पेठेत त्यांचे मोठे नाव आहे त्यांना असे करण्याची कदापी गरज नाही. त्यामुळे निष्पक्षपणे त्या घटनेची चौकशी व्हावी. गुप्ता यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीत आठवडे बाजाराच्या दिवशी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एक पिशवी दुकानात आणून ठेवलेली होती.ती पिशवी कोणी ठेवली याचा तपास गृहखाते व शासनाने करावा व त्याचेवर गुन्हा दाखल करावा.
दरम्यान, संतोष गुप्ता यांचे बाबतीत जे घडले. ते भविष्यात इतर कोणत्याही राजकारण्यांच्या बाबतीत घडू नये, व्यापाऱ्यांवर देखील असा प्रसंग येऊ शकतो त्यामुळे घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यातील दोषींना पोलिसांनी पकडावे व संतोष गुप्ता यांना न्याय द्यावा असेही आ.कांदे यांनी लक्षवेधीत मांडले. दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाची बाजू पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लक्षवेधीद्वारे सभागृहाच्या पटलावर आणल्याने तालुक्यातील विरोधकांची मात्र गोची झाली आहे..
अशी झाली कारवाई..
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानात गांजा असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय कार्यालयाला मिळाली होती. त्या माहितीनुसार मनमाड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या पथकाने 24 जूनला संतोष गुप्ता यांच्या दुकानात छापा टाकला असता 80 हजार रुपये किमतीचा ८ किलो गांजा मिळून आला होता.या कारवाईनंतर संतोष गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले होते..
कारवाईसाठी राजकीय दबाव असल्याचा आरोप
दरम्यान, या कारवाईनंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांचेवर केलेली कारवाई ही राजकीय दबावातून झाल्याचा आरोप करत नांदगाव, मनमाड बंदची हाक दिली होती. या नांदगाव, मनमाड बंदला सर्वपक्षीय नेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
हे ही वाचा :