Nashik News : नाशिकमध्ये निवारागृहात शिरले पुराचे पाणी, रेस्क्यू ऑपरेशनद्वारे 65 बेघरांची सुखरूप सुटका
Nashik News : नाशिक (Nashik) येथील मनपाच्या निवारागृहात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 65 बेघरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) सुखरूप बाहेर काढले आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह गंगापूर पाणलोट (Gangapur Dam) क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदाकाठालगत असलेल्या महापालिकेच्या बेघरांच्या निवासस्थानात पुराचे पाणी शिरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पूर परिस्थिती होण्याआधी येथून 65 बेघरांना सुखरूप बाहेर काढले आहे.
मागील तीन दिवसांपासून नाशिक शहराला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे गोदावरीला पूर (Godavari Flood) आला आहे. काल पुराच्या पाण्यात वाढ झाल्यानंतर गोदा काठालगत असलेल्या संत गाडगे महाराज धर्म शाळेला लागून महापालिकेने सुरू केलेले निराश्रीतांचे निवासस्थानात पुराचे पाणी शिरले. अधिकच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी निराश्रीत निवासस्थान आत एकूण 65 वयोवृद्ध पुरुष महिला बेघर व्यक्ती आश्रयास होत्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना सुरक्षित रित्या पायऱ्यांच्या माध्यमातून गाडगे महाराज मठापर्यंत आणत सुटका केली.
पंचवटीतील गोदा काठ परिसरात नेहमी वर्दळ असते. परिसरात मोठ्या संख्येने भिक्षेकरी, बेघर, दिव्यांग व्यक्तींचा वावर असतो. नाशिक महापालिकेने गाडगे महाराज धर्मशाळेला लागून निराश्रीत बेघरांचे निवासस्थान उभारले आहे. या निवारागृहात वयोवृद्ध, पुरुष, महिला वास्तव्यास होत्या. सद्यस्थितीत गंगेला पूर आला असल्याने नदी काठच्या व्यावसायिकांना, नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. काल सकाळी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असताना अचानक निवारागृहात 65 निराश्रित अडकून पडल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली.
त्यानुसार नाशिकचे अग्नीशमन दलाचे केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, लीडिंग फायरमन इकबाल शेख, दत्ता गाडे, सोमनाथ थोरात, अनिल गांगुर्डे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दिव्यांग, बेघर वयोवृद्धांना त्यांच्या सामानासह स्ट्रेचरवर तर काहींना कडेवर उचलून जवानांनी सुखप्रु बाहेर काढले. तसेच उर्वरित सर्व वयोवृद्धांना त्वरित निवारागृहातून सुखरूप बाहेर काढले. एकूण 65 बेघरांची सुटका करण्यात जवानांना यश झाले. हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होताच गोदावरीच्या पुराच्या पाण्यात अधिक वाढ झाल्याने पुराचे पाणी थेट या निवारागृहात शिरले होते. तत्पूर्वीच अग्निशामन दलाच्या जवानांनी या बेघरांची सुटका केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.