Nashik Books Library : नाशिकमधून अडीच कोटी रुपयांच्या ग्रंथसंपदेची परदेशवारी, 'ग्रंथ तुमच्या दारी'चा अनोखा उपक्रम
Nashik Books Library : कॅनडातील टोरांटो (Toranto) येथील मराठी वाचकांसाठी नाशिकच्या (Nashik) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'ग्रंथ तुमच्या दारी' उपक्रमातून 20 ग्रंथपेट्या रवाना करण्यात आल्या आहेत.
Nashik Books Library : कॅनडातील टोरांटो येथील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना मराठी पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'ग्रंथ तुमच्या दारी' उपक्रमातून 20 ग्रंथपेट्या रवाना करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जवळपास अडीच कोटीहून अधिक रुपयांची पुस्तके परदेशवारीसाठी गेली आहेत.
नाशिकमध्ये पुस्तक प्रेम वाढत चालले असून हे पुस्तक प्रेम अधिक खोलवर रुजविण्यासाठी नाशिकचे विनायक रानडे मेहनत घेत आहेत. मागील बारा तेरा वर्षांपासून नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु केलेल्या ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथ तुमच्या दारी या दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून देणाऱ्या वाचकप्रिय योजनेमुळे अडीच कोटी पेक्षा जास्त रुपयांची पुस्तके वाचण्यासाठी भारतात आणि भारताबाहेर पंधरा देशांत फिरत्या ग्रंथपीठ यांच्या स्वरूपात आहेत.
कॅनडा येथे वास्तव्यास असलेले पण मूळचे भारतीय असलेल्या सोनाली शिवकुमार संभेराव हे वाचनप्रेमी दांपत्य मागच्याच महिन्यात कुसुमाग्रज स्मारकात आले होते. त्यावेळी त्यांनी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही योजना खूपच भावली. परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणार्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता टोरंटो येथील सोळा वाचक कुटुंबीयांनी देणगीरूपाने आर्थिक पाठबळ देऊन सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे सोनाली संभेराव समन्वयक यांच्या पुढाकाराने वीस ग्रंथपेट्या कॅनडातील टोरांटो येथे रवाना होत आहेत.
दरम्यान एका ग्रंथ पेटीत 25 पुस्तक आहेत. प्रत्येक पेटीतील पुस्तक वेगळी असतात. विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यासाठी उपलब्ध होतात. दर 03 महिन्यांनी पेट्या परस्परांच्यामध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते. भविष्यात जशा ग्रंथ पेट्या वाढत जातात तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तक आपल्या वाचकांना उपलब्ध होतात. वाचनसंस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट दिले तर वाचक वाढतील.
या संदर्भात विनायक रानडे म्हणाले की, "जगभरात सर्व देशांमध्ये मराठी माणूस पोहोचलेला आहे. त्यांच्यासाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे. जिथे मराठी शब्द आणि मराठी भाषा आहे, जिथे मराठी माणूस आहे तिथे-तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे. तसेच कोरोना काळात रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना पुस्तके मिळवून देण्याचं कामही या योजनेकडून करण्यात आले आहे."
जगभर ग्रंथपेट्या
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्वासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्विझरलँड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वाशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, श्रीलंका, ब्रिस्बेन आणि आता टोरंटो येथे एकूण मिळून अडीच कोटींची ग्रंथसंपदा नागरिकांना उपलब्ध झाली आहे. भारतात 80 जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशा त्यांच्या जवळच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत.