Nashik Booster Dose : नाशिक जिल्ह्यात साडेचारशे केंद्रांवर मिळतोय बूस्टर डोस, शहरात पहिल्याच दिवशी साडे सहा हजार डोस
Nashik Booster Dose : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात साडे चारशे केंद्रावर बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरवात झाली असून शहरात पहिल्याच दिवशी साडे सहा जणांनी डोस (Corona Vaccination) घेतला आहे.
Nashik Booster Dose : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकसह जिल्ह्यात बूस्टर डोसला सुरवात झाली असून शहरात पहिल्याच दिवशी साडे सहा जणांनी डोस घेतला असून जिल्ह्यात साडे चारशे केंद्रावर बूस्टर डोस देण्यास सुरवात केली आहे.
तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 'बूस्टर डोस' (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नाशिक शहरासह जिल्हयात शुक्रवार दि.15 जुलै पासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याचा देण्यात येणार आहे.
दरम्यान यापूर्वी फ्रंटलाइन कर्मचारी आणि इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना हे प्रिकॉशन डोस देण्यात आले आहेत. आता शासनाने हे प्रिकॉशन डोस ऐच्छिक ठेवत सर्व नागरिकांना खुले केले आहे. ज्यांना आवश्यक आहे, असे वाटणाऱ्या 18 वर्षांवरील कोणत्याही नागरिकाला हा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे.यापूर्वी दूसरा डोस घेतल्यावर 9 महिन्यांनंतर प्रिकॉशन डोस घेता येत होता. त्यात देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तिसरा डोस. घेण्यासाठी आता नागरिकांना 9 महिने नव्हे, तर दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यांचा कालावधी झाला असला तरी हा डोस घेता येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रिकॉशन डोससाठी पुन्हा रांगा लागण्याची शक्यता आहे.
बूस्टर डोससाठी हि व्यक्ती पात्र
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. आणि त्यांना दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे ज्या लसचे आधी दोन डोस दिल गेले होते, तीच लस तिसऱ्या डोसला देखील दिली जाणार आहे. एखाद्याने कोविशिल्ड लसीचे डोस दिले असतील तर प्रिकॉशन डोसही कोविशिल्डचाच दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे पूर्वीचे डोस कोव्हॅक्सिन असतील तर कोव्हॅक्सिनचीच लस दिली जाईल. त्यासाठी नाशिक महानगपालिकेच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करु शकतात. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आरोग्य केंद्रावर जाऊन डोस घेता येणार आहे.
पुरेशा प्रमाणात लसींचा साठा
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये म्हणाले कि, जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर पहिल्या दिवसापासून किमान शंभर डोसची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. पुढील 75 दिवस नागरिकांना हे सर्व प्रिकॉशन डोस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध असल्याने अधिकाधिक नागरिकांनी लसचा लाभ घ्यावा. तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत बूस्टर डोस देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.