(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : शून्य रुपये खर्चात शुभमंगल! इथं साधा संपर्क, महाराष्ट्रदिनी सामुदायिक विवाह सोहळा
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) महाराष्ट्रदिनी 51 सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Nashik News : लग्न सोहळ्यासाठी (Marriage) लाखो रुपये खर्च करण्याची पद्धत समाजात रुढ होत असताना दुसरीकडे येत्या महाराष्ट्रदिनी (Maharashtra Day) अर्थात 1 मे रोजी नाशिकमध्ये (Nashik) धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार 51 सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजासमोर आदर्श घालून दिला जाणार आहे.
अलिकडच्या काळात सोहळे खर्चिक झाल्याने सामान्य सामान्य स्तरातील लोकांना मुला-मुलींचे लग्न करणे अवघड झाले आहे. मानपान, परंपरा, रितीरिवाज तसेच खर्चिक बाबींमुळे सामुदायिक विवाह सोहळ्यांकडे (Community Marriage Ceremony) कल वाढत आहे. विशेषतः आर्थिक स्तर सामान्य असलेले आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहीद जवान पाल्य, बेघर, ऊसतोड कामगार, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जाती, मागासवर्गीय अनाथ यांचे विवाह वधू- वराकडील 40 व्यक्तींची भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. त्या-त्या दाम्पत्याच्या धार्मिक पद्धतीने हे विवाह लावून देण्यात येणार आहेत. तसेच वधू-वरांसाठी पोशाख मंगळसूत्र आणि धार्मिक विधी साहित्य मोफत देण्यात येणार आहे.
दरम्यान पैशाअभावी लग्न होण्यास अडचणी येणाऱ्या गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलीचे लग्न लावून देणे. या प्रमुख उद्देशाने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 01 मे रोजी हा सोहळा पार पडणार आहे. लग्न करू इच्छिणाऱ्या वधु-वराकडून एक रुपयाही शुल्क आकारले जाणार नाही. नाशिक शहरातील गुरुगोविंद पब्लिक स्कूल येथे हा सोहळा होईल. सदर उपक्रमाची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांची समिती पार पाडणार असून शहरातील वधूवरांना याबाबत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित
दरम्यान सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी शहरातील तसेच जिल्हाभरातील देवस्थान, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था तसेच सेवाभावी संस्था यांचे योगदान लाभत असून त्यासाठी धर्मादायसह आयुक्त टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन धर्मदाय उपायुक्त के. एस. जाधव, सहाय्यक आयुक्त जिल्ह्यात राम लिप्ते, श्रीमती खरोसे त्यात कार्यरत आहेत.
नावनोंदणीचे आवाहन
दरम्यान शहरातील इच्छुक वधू वरांची या विवाह सोहळ्यासाठी दि. 20 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करण्यात येणार असून निवड झालेल्या जोडप्यांना याबाबत कळविण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी श्री कालिका मंदिर, जुना आग्रा रोड नाशिक या पत्त्यावर अथवा 9396269916 या व्हाट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.