Nashik Grapes : 170 टन नेदरलँड, तर 30 टन लॅटव्हिया, स्वीडनला, एकट्या नाशिक जिल्ह्यातून 90 टक्के द्राक्षांची निर्यात
Nashik Grapes : नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नेदरलँड, स्वीडनला निर्यात केली गेली आहेत.
Nashik Grapes : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला (Grapes Export) सुरुवात झाली असून, गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 15 कंटेनरमधून 200 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. 170 टन द्राक्षे नेदरलँडला निर्यात केली गेली आहेत, तर उर्वरित 30 टन द्राक्षे लॅटव्हिया आणि स्वीडनला निर्यात केली गेली आहेत.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुणवत्तेचे उत्पादन आणण्यासाठी कष्ट व पैसे खर्च केले तरी मालाची विक्री करायची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढच होत गेली. मागील वर्षी देशांतर्गत द्राक्ष विक्रीची अडचण होती; मात्र निर्यात सुरळीत होती. यावर्षी मात्र शेतीमाल विक्रीची अडचण राहिली नाही. शेतकऱ्यांनी यावर्षी निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे तयार केली असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचण झाल्याची सल मनात ठेवत उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा गुणवत्तेची द्राक्षे तयार केल्याने निर्यात वाढली आहे. सोमवारपर्यंत राज्यातून लाखो मेट्रिक टन द्राक्षं निर्यात झाली आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यातून 2 लाख टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा युरोपीय देशांची मागणी लक्षात घेता 1.25 लाख टन ते 1.50 लाख टन द्राक्ष निर्यात होण्याची अपेक्षा आहे. द्राक्ष उत्पादकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे (एमआरडीबीएस) उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील हवामान द्राक्षबागांसाठी अनुकूल आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या हंगामाच्या सुरुवातीला द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली. गतवर्षी याच कालावधीत द्राक्ष निर्यात सुरू व्हायची होती. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, त्यांना या हंगामात निर्यातीत 20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले म्हणाले, जानेवारीच्या उत्तरार्धात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्याची अपेक्षा करत आहोत, जो 15 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान जोरात असेल. सुमारे 30 टक्के द्राक्ष निर्यात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होते,” भोसले म्हणाले.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी आतापर्यंत 24,000 शेतकऱ्यांनी सुमारे 15,400 हेक्टरवर द्राक्षबागांची नोंदणी केली आहे. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणले कि, एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात होईल. सध्या द्राक्षाचा पीक कालावधी आहे. वाऱ्याचे व अवकाळी संकट आले नाही तर निर्यात वेगाने होईल. देशांतर्गत द्राक्ष विक्रीचे दर वाढत असले तरी द्राक्ष निर्यात करणारा शेतकरी वर्ग वेगळा आहे. यावर्षी आतापर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी दोनशे टनावर गेली आहे. तर दुसरीकडे अद्याप अनेक शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची द्राक्ष काढणी बाकी असल्याने निर्यातक्षम द्राक्ष माल वाढणार देशासह परदेशात निर्यात वाढणार असल्याचे ते म्हणाले.