(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : रात्रीस खेळ चाले! शेतकऱ्यांना खतांची टंचाई, तर दुसरीकडे रात्रीतून खतांचा काळाबाजार
Nashik News : गेल्या काही दिवसांत राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात खते, बी बियाणांचा काळाबाजार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
Nashik News : गेल्या काही दिवसात राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात खते, बी बियाणांचा काळाबाजार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचे प्रमाण वाढतच असून नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यात युरियाचा काळाबाजार उघडकीस आला आहे. जवळपास वीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीकामांना वेग आला असून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खते बी बियाणे (fertilizers) खरेदीत वाढ झाली आहे. मात्र याच सुमारास खतांचा काळाबाजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना युरियाची टंचाई जाणवत असते. युरियाला असलेली मागणी लक्षात घेऊन काही जणांकडून त्याची साठवणूक केली जाते. तर काहीजण काळ्याबाजारात युरियाची विक्री करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला असताना निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला असून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने केंद्र सरकार अनुदानित काळ्या बाजारात जाणाऱ्या युरियाची मालवाहू ट्रक निफाडजवळ पकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लासलगाव पोलीस स्टेशनच्या (Lasalgaon) हद्दीत भरवस फाटा ते नांदगाव या रस्त्यानजीक एक कांदा चाळीत केंद्र सरकारच्या अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक जन परियोजना असा शिक्का असलेल्या गोण्या इतर बिगर शिक्क्यांच्या गोण्यांमध्ये भरून तो युरिया काळ्या बाजारात विकला जात होता. याची नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला कुणकुण लागताच पोलीस पथकाने पाळत ठेऊन मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रकमधून मुद्देमाल मुंबईला नेत असतांना नांदगाव रस्त्यावरील भरवस फाटा येथे ट्रक पकडला आहे. या धाडीत 20 लक्ष रुपयांच्या 502 गोण्यासह 20 लक्ष रुपयांची ट्रक असा सुमारे 40 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित संतोष भाऊराव वारुळे, बापु सूर्यभान शिंदे, प्रकाश रामभाऊ ठाकरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध व्हावा, म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना चालू केली आहे. त्याअंतर्गत 2200 रुपये किमतीची अनुदानित गोणी शेतकऱ्यांना अवघ्या रुपयांना मिळते. मात्र हे तस्कर केंद्र सरकारचा शिक्का असलेल्या गोण्या नष्ट करून इतर गोण्यांमध्ये हा युरिया भरून मुंबईला कंपन्यांना 3 ते 5 हजार रुपये दराने विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात युरिया टंचाई जाणवते. त्यातच अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना नाहक फटका सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राज्यातील शेतकऱ्यांपुढे 'बोगस बियाणां'चं नवं संकट; आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल