Nashik : रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, आदिवासी पाड्यावरील भयावह स्थिती
Nashik News : दिवसभर काबाडकष्ट करायचं आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम इथल्या महिलांचा आहे.
Nashik News : महाराष्ट्र ज्यावेळी झोपेची तयारी करत असतो त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील महिला पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागलीय. त्यामुळे रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात महिलांचा हंडाभर पाण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो
..आणि रात्रीच्या अंधारात महिलांचा अनवाणी प्रवास सुरू होतो
डोक्यावर, कमरेवर हंडा, कळशी हातात टॉर्च घेऊन, पाण्याच्या शोधात आदिवासी पाड्यावरील या महिला निघतात. हे चित्र आहे सुरगाणा तालुक्यातील मोरडा गावचं, साधारणतः 600 लोकवस्तीचे गाव, मात्र पिण्यासाठी पाणीच नसल्यानं महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकावं लागतं. दिवसभर काबाडकष्ट करायचं आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम यांचा आहे. गावातील विहिरीने तळ गाठलाय. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादं दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर दऱ्याची काट्याकुट्याची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरु होतो. हिंस्र पशूंची भीती असल्यानं गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी मोबाईल फ्लॅशचा उपयोग करून महिलांच्या मदतीसाठी तैनात असतात, यात एखादा झरा सापडला तर महिलांची रांग लागते, मात्र एक हंडा भरता भरताच नाकी नऊ येत असल्याने पुढच्या ठिकाणचा शोध सुरू होतो..
वर्षोनुवर्षे हीच अवस्था..
गावाजवळ एका ठिकाणी पाण्याचं मोठं डबकं साचलंय, गावातील निम्याहून अधिक महिला तिथे तुटून पडतात. डबक्याच्या आजूबाजूला चिखल असल्यानं पाणी अत्यंत खराब, गढूळ आहे, दिवसभर गुर ढोर ही इथेच तहान भागवतात आणि रात्री गावच्या महिला हेच पाणी घरी घेऊन जातात, वर्षोनुवर्षे हीच अवस्था आहे, पाणी भरून भरून महिला थकून जातात, त्यांचे हाल त्यानांच सोसवेनासे होतात मात्र पर्याय नसल्याने पाणीच्या खेपा माराव्याच लागतात, लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकी पुरते येताय आश्वासन देऊन निघून जातात मात्र ना पाण्याची कायमस्वरूपी सोय होते ना तात्पुरते पाण्याचे टँकर येतात
गावातील सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते
हा केवळ मोरडा या एकाच गावाचा प्रश्न नाही तर आजूबाजूच्या. गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा आशा अनेक गावची समस्या आहे.गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी होत आहे
सरकारला पाझर कधी फुटणार?
देशाच्या स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करतोय, मात्र आज पर्यंत आदिवासी पाड्याची तहान भागविण्यासाठी ठोस पावले उचललीच नाहीत, पंतप्रधान, मुख्यमंत्री पेय जल योजना कागदावरच दिसत आहेत, म्हणूनच कुठे जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून ,तर कुठे रात्रीच्या अंधारात, पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यामुळे सरकारला पाझर कधी फुटणार? पाण्याची सोय कधी होणार? याकडे आदिवासी बांधवांचे डोळे लागले आहेत.