Aurangabad Acb Trap : नाशिकनंतर औरंगाबादच्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर एसबीची कारवाई; गुटखा विक्रेत्याकडे मागितला 25 हजारांचा हप्ता
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे,अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. एच. क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे.
Aurangabad Acb Trap : नाशिकमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पकडल्याची घटना ताजी असतानाच आता औरंगाबादमध्ये सुद्धा एका महिला पोलीस अधिकाऱ्याने 25 हजाराची लाच मागितल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करण्यासाठी महिन्याला 25 हजाराचा हप्ता देण्याची मागणी दौलताबाद पोलीस ठाणाच्या पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्याकडून करण्यात आली होती. त्यांनतर पहिला हप्ता स्वीकारताना एका पोलिस नाईकला औरंगाबाद लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. तर पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासह पोलीस नाईक रणजित सुखदेव शिरसाठ (53) यांच्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी दौलताबाद पोलीस ठाण्यात बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या पोलीस ठाणाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासुन गुटखा विक्री जोरात सुरु होती. त्यामुळे पोलीस ठाणे हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्याला मिसाळ यांनी 24 मार्च रोजी हवालदारामार्फत बोलावणे पाठवले. त्यांनतर गुटखा विक्री करण्यासाठी महिन्याला 25 हजाराचा हप्ता द्यावा लागेल असे मिसळ यांच्याकडून त्या विक्रेत्याला सांगण्यात आले. मात्र तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच पोलीस नाईककडून सुद्धा आपल्याला वेगळे दोन हजार देण्याची मागणी करण्यात आली.
मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने गुटखा विक्रेत्याने थेट औरंगाबाद एसीबीचे कार्यालय गाठत तक्रार दिली. त्यांनतर गुरुवारी 12 वाजता पोलीस ठाण्यातच पैसे देण्याचे ठरले आणि त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावला. यावेळी पोलीस नाईक रणजित शिरसाठ याने मिसाळ यांचे दहा हजार आणि स्वतःचे दोन हजार रुपये स्वीकारले. त्यांनतर लगेचच एसीबीच्या पथकाने पोलीस नाईकला रंगेहात पकडले.
पोलीस दलात खळबळ....
नाशिक शहरातील महत्वाचे समजले जाणारे भद्रकाली पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस नाईकास लाच स्वीकारताना पकडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यांनतर लगेचच दोन दिवसांनी औरंगाबादच्या दौलताबाद पोलीस पोलीस ठाणाच्या प्रमुख सुनीता मिसाळ यांच्यावर एसबीची कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.