Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
Nashik Central Assembly Constituency : नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चिघळल्याचे दिसून येत आहे. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकले आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. महाराष्ट्रात एकच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. नुकतीच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून (Nashik Central Assembly Constituency) वसंत गीते (Vasant Gite) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता वसंत गीते यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेस (Congress) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी थेट काँग्रेस कमिटी कार्यालयालाच टाळे ठोकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये विधानसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद चिघळल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी थेट काँग्रेस कमिटी कार्यालयालाच टाळे ठोकले आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. वसंत गीतेंच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र असून आता काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यासमोर आहे.
निफाडला महायुतीत रस्सीखेच
दरम्यान, निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. दिलीप बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत दिलीप बनकर यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे निफाडची जागा भाजपला सुटावी किंवा सक्षम उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी यतीन कदम आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे निफाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी