(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : सातपूर परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून रेस्क्यू करण्याचे काम सुरु
Nashik Leopards : नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर भागात आज पुन्हा बिबट्या निदर्शनास आल्याने धावपळ उडाली आहे.
Nashik Leopard : नाशिककर आणि बिबट्या हे जणू समीकरण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचा वावर हा वाढला आहे. आज पुन्हा सातपूर परिसरातील अशोकनगर भागात बिबट्या निदर्शनास आल्याने वनविभागाची धावपळ उडाली आहे.
नाशिक शहरातील सातपूर भागातील अशोकनगर परिसरात आज (2 जुलै) सकाळी पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला असून रेस्क्यू करण्याचे काम सुरु आहे. अशोकनगर भागातील पाण्याच्या टाकी जवळील शिवतीर्थ या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये हा बिबट्या लपून बसला आहे. दरम्यान वन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे बघ्यांची मोठी गर्दी पाहायला या ठिकाणी मिळत आहे.
काही दिवसापूर्वीच शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्या निदर्शनास आला होता. त्यानंतर सातपूर भागातीलच एका कंपनीच्या शेडमध्ये बिबट्याचे दर्शन झालं होतं. आज पुन्हा एकदा सातपूर एमआयडीसी परिसरातील अशोकनगर भागात बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाची चांगली धावपळ उडाली आहे.
अशोकनागर हे सातपूर एमआयडीसी भागातील वर्दळीचं ठिकाण असून या परिसरात कामगार वर्गाची वसाहत आहे. बिबट्या येथील काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बेसमेंटमध्ये असून अद्याप बिबट्याची कुठलीही हालचाल दिसून आली नाही. मात्र वनविभाग सतर्क असून वनविभागाच्या व्हॅनसह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल आहे.
सातपूर एमआयडीसी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी बिबट्याचं दर्शन
दोन आठवड्यापूर्वी सातपूर एमआयडीसी परिसरातील यश एंटरप्राइजेसजवळ बिबट्याचे दर्शन झाले होते. रात्रीच्या सुमारास हा बिबट्या येथील वसाहतीतून फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर कंपाऊडवरुन उडी मारुन बिबट्या पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्यामुळे एकीकडे निसर्गाच्या सानिध्यात राहणारा बिबट्या आता शहरात धाव घेऊन लागला आहे. शहरातील वर्दळीच्या तसेच्या वसाहतीच्या ठिकाणी नागरिकांच्या दृष्टीस बिबट्या पडत असल्याने भीतीचे वातावरण आहे.