Kisan Sabha : किसान सभेचा राज्य सरकारला तीन दिवसाचा अल्टीमेटम; प्रसंगी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार
राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर जेल भरो आंदोलन, उपोषण किंवा मुबंईपर्यत लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारकडून कोणताही संवाद झालेला नाही.
नाशिक : नाशकात (Nashik News) सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या किसान सभेच्या (Kisan Sabha) पदाधिकाऱ्यांची बैठक आज (28 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीत सरकारला तीन दिवसाचा अल्टीमेटम देण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलक शेतकऱ्यांकडून एक मार्चपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. एक मार्चपर्यंत सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर तीव्र आनंदोल छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम कायम राहणार आहे.
राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर जेल भरो आंदोलन, उपोषण किंवा मुबंईपर्यत लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारकडून कोणताही संवाद झालेला नाही. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने त्यांना त्रास होईल असं कोणी वर्तन करणार नाही अशा सूचना केल्या आहेत, कलेक्टर ऑफिस, न्यायालय यांना देखील आंदोलनाचा त्रास होणार नाही ही आमची भूमिका असल्याचे किसान सभेकडून सांगण्यात आलं आहे.
काय आहेत मागण्या?
किसान सभा आणि माकपकडून विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. यामध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी आदी प्रमुख मागण्या आहेत. तसेच इतरही मागण्या आहेत. दरम्यान, राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये मंगळवारी मुंबईत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. आक्रमक आंदोलकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाची कोंडी केली. तीन दिवसांपासून अधिकारी वर्गाला आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेता आलेली नाहीत.
तोपर्यंत मागे हटणार नाही
दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून त्याच मागण्या केल्या जात आहेत, मागील वर्षी मुबंईच्या दिशेनं मोर्चा काढला होता, शहापूरजवळ मोर्चा थांबला, तिथे सरकारने आश्वासन दिले. मात्र, ते देखील पाळले नाही, त्यामुळे आता जोपर्यंत अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
सीबीएस चौकात जाणारे सर्व मार्ग बदलले
किसान सभा आंदोलनात आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. नाशिक शहरातील मुख्य चौक असणाऱ्या सीबीएस चौकात लाला मोर्चातील आंदोलनकर्ते अचानक आल्यानं पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्यानं बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सीबीएस चौकात जाणारे सर्व मार्ग बदलण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या