(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकला पाच दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरूच, सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तोडगा निघणार का?
Nashik News : माकप आणि किसान सभेच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे.
Nashik News नाशिक : माकप आणि किसान सभेच्या (Kisan Sabha Protest) नेतृत्वाखाली निघालेला पायी लॉन्ग मार्च सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे.
एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, गुरुवारी 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असतांना देखील हे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik Collector Office) रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. आतापर्यंत शासनासोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या तीन बैठका झाल्या आहेत.
आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
तीन बैठका होऊनदेखील कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार असून या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्ता पाच दिवसांपासून बंद असल्याने शहरवासीय मात्र वेठीस धरले जात आहेत.
88 वर्षीय दळवी बाबा आजारी असूनही आंदोलनावर ठाम
दरम्यान, या आंदोलनात चार दिवसांची पायपीट करून आलेले एक 88 वर्षीय आजोबा आजारी पडले आहेत. या आजोबांना ताप, अंगदुखी, खोकल्याचा त्रास होता असतानाही ते आंदोलनावर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका दळवी बाबा घेतली आहे. मुंबईला (Mumbai) निघालेल्या पायी लॉन्ग मार्चमध्येही देखील दळवी बाबा सहभागी झाले होते.
या आहेत मागण्या
किसान सभा आणि माकपकडून विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. यामध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी आदी प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये मंगळवारी मुंबईत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. चार दिवसांपासून अधिकारी वर्गाला आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेता आलेली नाहीत.
सीबीएस चौक बंद असल्याने नाशिककर त्रस्त
नाशिक शहरातील मुख्य चौक असणाऱ्या सीबीएस चौकात शेतकरी मोर्चातील आंदोलनकर्ते अचानक आल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाल्याचे दिसून आले होते. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे सीबीएस चौकात जाणारे सर्व मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आणखी वाचा