![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी! अखेर आठ दिवसांनंतर नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, दादा भुसेंच्या बैठकीत तोडगा निघाला
Nashik News : गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला आहे.
![मोठी बातमी! अखेर आठ दिवसांनंतर नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, दादा भुसेंच्या बैठकीत तोडगा निघाला Kisan Sabha Protest in Nashik Finally after eight days protest of farmers is over J P Gavit Dada Bhuse Maharashtra Marathi News मोठी बातमी! अखेर आठ दिवसांनंतर नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, दादा भुसेंच्या बैठकीत तोडगा निघाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/04/ebeea5b1e794eaa620bea3afd48ba67c1709556318333923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kisan Sabha Protest : गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु होते. याबाबत प्रशासनासोबत झालेल्या पाच बैठका निष्फळ ठरल्या होत्या. मात्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या सहाव्या बैठकीत यावर तोडगा निघाला आहे. शेतकरी आंदोलकांनी अखेर आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोनवरून संवाद साधत आंदोलक शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन संपले असून लाल वादळ परतणार आहे.
तीन महिन्यात कामं मार्गी लागणार असल्याचे आश्वासन
बैठक संपल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काही विषय जिल्हा तर काही राज्य आणि केंद्र पातळीवरचे होते. जिल्हा पातळीचे काम सुरू करण्यात आले आहे, राज्याच्या प्रश्नांबाबत अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थितीत चर्चा झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत तीन महिन्यात काम मार्गी लागणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक विषय प्रगतीपथावर आहेत.
सातबाऱ्याच्या विषयावर अभ्यास सुरू
आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाचे फोनवरून बोलणे करून दिले आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांचे समाधान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. सातबाऱ्याच्या विषयावर अभ्यास सुरू आहे. घरकुलाबाबत देखील बोलणे झाले आहे. त्यांना शबरी योजनेत घरे देऊ. कांद्याबाबत केंद्र सरकार निर्देश देत असते. याबाबत शासनपातळीवर चर्चा सुरू आहे.
आंदोलन मागे घेतल्याने जे पी गावितांचे आभार
अंगणवाडी, मदतनीस यांचा विषयावर दादा भुसे म्हणाले की, 2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनबाबत मागणी आहे. राज्य शासनाने, मुख्यमंत्र्यांनी याबाबत आधीच घोषणा केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल. तीन महिन्यांचा टाईम बॉण्ड देण्यात आला आहे. पुन्हा आंदोलन करण्याबाबत त्यांना लोकशाहीकडून अधिकार आहे. गावित साहेबांना आम्ही विनंती केली होती की, दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहे. हा मुख्य रस्ता बंद आहे. तीन महिन्यांचा काळ दिला आहे. पण आचारसंहिता जरी आली तरी काही फरक पडणार नाही, ही रुटीन प्रोसेस आहे, असे त्यांनी सांगितले. जे पी गावित यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतल्याने त्यांचे मी आभार मानतो, असे दादा भूसेंनी म्हटले आहे.
...तर पुन्हा लढा सुरू होईल - जे पी गावित
यावेळी जे पी गावित म्हणाले की, आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेत त्यावर आश्वासन दिले. तीन महिन्यात या मागण्या पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयात पोहचले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील आम्हाला हमी दिली आहे. तीन महिन्यात मागण्या पूर्ण होण्याचं आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आम्ही धरणे आंदोलन मागे घेत आहोत. जर तीन महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दादा भुसे यांच्या घरावर घेराव घालू. तसेच दादा भुसे यांच्या विरोधात प्रचार करू. दादा भुसे यांच्यावर आमचा विश्वास आहे, ते आम्हाला न्याय देतील. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा लढा सुरू होईल याची शासनाने आणि भुसे यांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)